Gopichand Padalkar, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Gopichand Padalkar News: इतक्या दिवस 'हाताची घडी तोंडावर बोट' असलेले पडळकर पुन्हा ठाकरे-पवारांवर बरसले, आता म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Gopichand Padalkar Criticizes Uddhav Thackeray: भगवा आमचा स्वाभिमान आहे, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतक्या खालच्या स्तराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं, असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बोचरी टीका केली आहे. तसेच शरद पवारांची राजकीय वेळ संपली असल्याचं म्हणत त्यांनी पवारांनाही डिवचलं आहे.

उद्धव ठाकरेंनी 'आरएसएस'च्या (RSS) ध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत गोपिचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "बाळासाहेबांचे पुत्र इतक्या खालच्या स्तराला जातील असं वाटलं नव्हतं. भगवा आमच्या सर्वांचा स्वाभिमान आहे. भगव्याविषयी आम्हाला प्रचंड आस्था आहे. ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही. त्यांचा संबंध आतां हिरव्याशी आहे. परंतु त्यांना या गोष्टीचा पश्चाताप आयुष्यभर होईल, असं पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, "बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कशी मानायची? म्हणून भाजपला घटना बदलायची आहे. जे.पी नड्डा (J P Nadda) म्हणाले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान म्हणाले होते. आधी आम्हाला वाटलं की ते हे तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशान नाही होऊ शकत. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार. संविधान तसंच राहणार. प्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार. पुतीन सारखा निवडून येणार नाही," असं म्हणत त्यांनी संघावर टीका केली होती.

विरोधकांचा अवाका किती?

माध्यमांशी बोलताना पडळकर पुढे म्हणाले, 'देशात आणि राज्यात जे लोकं पंतप्रधान मोदींना विरोध करत आहेत. त्यांचा अवाका किती आहे? त्यांना खूप मर्यादा आहेत. डबक्यातील बेडके डराव डराव करतात, तशा पद्धतीने ही लोकं महाराष्ट्रात बोलत आहेत. त्यामुळे मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे की, त्यांनी त्यांच्या नादाला लागून काही उपयोग नाही. चार जूननंतर यांची तोंडं काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत पडळकरांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आयुष्यभर पवारांनीच दुसऱ्यांची घरं फोडली

तसंच पडळकर यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) देखील टीका केली. पडळकर म्हणाले, शरद पवार यांचा पक्ष आता अडचणीत आहे. पण ते पेटू द्या. त्यात लक्ष देऊ नका. पवार आता काही झाले तरी सुधारणार नाहीत. त्यांची राजकीय वेळ संपली आहे. त्यांचे घरातीलच वाद मिटत नाहीत. भाजपने आमची घरे फोडली, असं पवार म्हणतात पण आयुष्यभर यांनीच दुसऱ्यांची घरे फोडण्याचं कामं केलं आहे, असं पडळकर म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT