Congress Meeting Lonavala Sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : करा किंवा मरा! काँग्रेसच्या स्थितीवर नाना पटोलेच बोलले...

Rajanand More

Lonavala News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे दोनदिवसीय राज्यस्तरीय शिबिर आजपासून लोणावळ्यात सुरू झाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह मिलिंद देवरा व बाबा सिद्दिकींनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर हे शिबिर होत असल्याने सर्वच नेत्यांच्या भाषणांबाबत उत्सुकता होती. पहिल्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असल्याची कबुली दिली. (Lok Sabha Election 2024)

लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या (Congress) दोनदिवसीय राज्यस्तरीय शिबिराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज ऑनलाइन केले. या वेळी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण आहे, परंतु त्यासाठी लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे. भाजपच्या तोडफोडीच्या व जातिधर्मात भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तीला लोक कंटाळले आहेत. सर्वांनी एकजुटीने काम केले, तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी खोट्यांचे सरदार

मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणाले, मोदी नेहमीच मोदीची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी पणा जास्त असतो. सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याची, दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याची, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या. या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवालही खर्गेंनी उपस्थित केला.

शिबिरात मांडले दोन ठराव

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिबिरात ठराव मांडला. भाजपने ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून पक्ष फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पाडले. काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. हा फक्त खाती गोठवण्यापुरता मर्यादित नाही हा लोकशाही आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रकार असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतकऱ्यांयांच्या पाठीशी उभी असून, शेतकऱ्यांचा आवाज दडपणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे. हा ठराव आमदार संग्राम थोपटे यांनी मांडला.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT