Sharad Pawar, Uddhav Thackeray, Sanjay Raut, Priyanka Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas : महाविकासच्या नेत्यांची पूर्व विदर्भाकडे पाठ, शुक्रवारी मतदान !

Sachin Deshpande

Vidharbha Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच झाली. त्यानंतर लोकसभा मतदारसंघातील अनेक जागांवर वाद समोर आले. पण, प्रचारात हे नेते एकत्र समोर येतील, असा विश्वास अनेकांना होता. पण, अगदी प्रचाराच्या तोफा थंडावल्या तरीदेखील नेते मात्र एकत्र आले नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद असल्याचे चित्र यावरून निर्माण झाले आहे. त्यामुळे एकमेकांच्या नेते, कार्यकर्ते आणि पाठीराखे महाविकासच्या उमेदवारांना मतदान करतील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुक होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे नेते पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात प्रचार दिसले नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार हे त्यांचे संयुक्त उमेदवार नव्हते काय, असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे. महाविकासचे नेते शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी पूर्व विदर्भातील महाविकासच्या उमेदवाराच्या प्रचाराकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचा वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्याला यामुळे बळ मिळते. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार यांनी केवळ वर्धा येथील अमर काळे यांच्यासाठी दौरा केला. त्यानंतर त्यांनीदेखील पूर्व विदर्भाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार या दिग्गज नेत्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ का दिली नाही, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. तशीच काय ती परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसबाबतीत होती. राष्ट्रवादीचे नेते महायुतीच्या प्रचारात दिसले नाहीत.

महायुतीच्या नेत्यांनी मात्र एकमेकांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आणि त्यांचे सर्वात मोठे प्रचारक नरेंद्र मोदी यांनी युतीला बळ देण्यासाठी दोनदा विदर्भाचा दौरा केला. एकदा चंद्रपुरात स्वतःचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि नंतर रामटेक मतदारसंघातील कन्हान येथे सेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे नेते आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीने मतदारसंघ पिंजून काढले आहेत. अमित शाह यांचीदेखील मोठी सभा महायुतीच्या उमेदवारासाठी झाली.

काँग्रेसचे सर्वात प्रमुख प्रचारक राहुल गांधी यांनी भंडारा येथील साकोली शहरात केवळ एक सभा घेतली. नागपूर येथे रॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विकास ठाकरे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. पण, काँग्रेस अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा मात्र पूर्व विदर्भात झाली नाही. वर्ध्यात उमेदवारी दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार हे एकटेच आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यापैकी कोणीच कसे सोबत आले नाही असा प्रश्न पडला आहे.

नुकतेच अमरावती येथे शिवसेना मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भेट दिली. पण, पहिल्या टप्प्यातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांनी पाय का ठेवला नाही असा प्रश्नच आहे. नागपूर येथे महाविकास आघाडीने संयुक्त प्रचारसभा का घेतली नाही, अशी विचारणा राजकीय वर्तुळात केली जात आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण आहे असे म्हणत काँग्रेस ने निवडणूकपूर्वी नागपुरात जाहीर सभा घेतली होती. तशी सभा निवडणुकीत का घेतल्या गेली नाही, असा मुद्दा चर्चिला जात आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT