Sanjay Raut and Navneet Rana Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : हनुमान चालिसा प्रकरणानंतर पहिल्यांदाच राऊत राणांशी सहमत !

Sachin Deshpande

Amravati Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला विदर्भातून समर्थन प्राप्त होईल, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांनी अमरावती येथे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीनंतर फडणवीस हे आकडे लावण्यात व्यस्त असतील, असे म्हणत राऊत यांनी टीकास्त्र सोडले. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या परिवर्तनांची सुरुवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही, पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे, असं संजय राऊत म्हणाले. निवडणुकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत, त्याबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्रात शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहेत 45 प्लस, त्यांचे आकडे काहीही असू द्या. त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणुकीच्या नंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीत शिवसेनेचा विजय होईल असे म्हणत काँग्रेस स्वतःचे नेते कार्यकर्ते ताब्यात ठेवू शकत नसल्याची ओरड खासदार संजय राऊत यांनी अमरावती येथे केली. त्यांनी सांगलीत काँग्रेस नेते अपक्ष निवडणूक लढत असल्याची चिंता व्यक्त करत काँग्रेसने बंडखोरांवर कारवाईची मागणी संजय राऊत यांनी केली. काँग्रेस पक्षांतर्गत तो विषय असून, शिस्तभंग कोणी करत असेल तर हकालपट्टी करा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. तर सांगलीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांचा विजय होईल असे ही राऊत सांगण्यास विसरले नाही.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल. महाराष्ट्रात इंडिया आघाडीला 35 प्लस आणि देशात 305 जागा मिळतील. मुख्यमंत्र्यांना त्यांचा उमेदवार बदलावा लागला, विद्यमान खासदारांला तिकीट देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना रोड शो घेऊ द्या, काहीही हातात पडणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांचं राम प्रेम खोटं आहे. कोणत्याही लढ्यात आणि संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे राहत नाही. जो आत्मविश्वासाने लढतात त्यांच्या सोबत राम असतो, असा हल्लाही त्यांनी चढवला.

देशात मोदींची लाट आहे, या भ्रमात राहू नका, असं अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनी आपल्या विधानाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा नवनीत राणा यांनी केला होता. नवनीत राणा यांच्या या विधानाची देशात व राज्यात जोरदार चर्चा रंगलेली असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विधानाला उचलून धरले. हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा पती पत्नींच्या विरोधात असलेले शिवसेना नेते एकदम राणा यांच्या विधानाचे समर्थन करताना दिसले. खासदार संजय राऊत यांनी थेट नवनीत राणा यांच्या या विधानाशी सहमत दर्शवली आहे. अमरावतीच्या खासदार ताई अगदी बरोबर बोलल्या आहेत, देशात मोदीची लाट नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT