Social media  Sarkarnama
महाराष्ट्र

Social Media : सावधान ! लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र, सोशल मीडियावर पोलिसांचा 'वाॅच'

Police Action : पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नक्षलग्रस्त व संवेदनशील मतदान केंद्रावर भयमुक्त वातावरणात निवडणूक घेण्यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

Sachin Deshpande

Vidharbh Lok Sabha Election 2024 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात संवेदनशील मतदान केंद्र हे प्रशासनासाठी डोकेदुखीचे असतात. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची भीती असते. अशा ठिकाणी भयमुक्त वातावरणात निवडणूक व्हावी, यासाठी प्रशासनाने तगडा बंदोबस्त केला आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरदेखील पोलिसांचा वाॅच राहणार आहे. कोण कुठली पोस्ट करतो, कोण लाइक, काॅमेंट करतो याकडे पोलिसांचे लक्ष राहणार असून चुकीच्या पोस्ट शेअर, लाइक न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. इतकेच नाही तर व्हाॅट्सअॅपवर चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांसह ग्रुप ॲडमिनवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहे.

गोंदिया जिल्ह्यात 1288 मतदान केंद्रावर आज निवडणूक होत आहे. या ठिकाणी एकूण क्रिटिकल मतदान केंद्र 112 आहे. त्या दृष्टीने गोंदिया जिल्हा पोलिस दलाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. 9 वरिष्ठ पोलिस अधिकारी, 97 पोलिस अधिकारी, एकूण पोलिस अंमलदार, कर्मचारी बंदोबस्त -1916, एकूण होमगार्ड बंदोबस्त-1393 त्याच बरोबर केंद्रीय पोलिस बलाच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहे. इतकेच नाही तर नक्षल प्रभावित भागात पोलिसांची विशेष नजर असेल. नक्षलग्रस्त भागातील एकूण 6 पोलिस स्टेशन, 11 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत मतदान केंद्रावरील, केंद्राबाहेर संरक्षण, परिसर बंदोबस्तकरिता पोलिस स्टेशननिहाय सशस्त्र दूरक्षेत्र स्तरावर पोलिस स्टाफ तैनात करण्यात आले आहे. C-60 पार्ट्या, SAG पार्ट्या., केंद्रीय पोलिस बल, राज्य राखीव पोलिस दल यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नागपूर जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत. भयमुक्त वातावरणात निवडणूक होण्यासाठी ही तैनाती असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मतदान केंद्रासाठी भारतीय वायु सेनेच्या हेलिकाॅप्टर द्वारा पथके रवाना

गडचिरोलीत हेलिकाॅप्टरने पथके रवाना

जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात गुरुवारीच हेलिकॉप्टरने 80 पथके रवाना करण्यात आली. यामध्ये आरमोरी येथील 40, गडचिरोली येथील 12 आणि अहेरी येथील 28 संघांचा समावेश आहे. तसेच आरमोरीतून 84, गडचिरोलीतून 183, अहेरी व जीपमधून 92 पथके, आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 3, गडचिरोलीतून 19 आणि अहेरीतून एक पथक रवाना करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षलवादाचा धोका पाहता 16 एप्रिलपासून निवडणूक पथके बेसकॅम्पवर रवाना करण्यात येत असून, याअंतर्गत काल अहेरी येथून हेलिकॉप्टरने 68 मतदान पथके रवाना करण्यात आली आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 1891 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. आमगाव 311, आरमोरी 302, गडचिरोली 356, अहरी 292, ब्रम्हपुरी 316 आणि चिमूर विधानसभा मतदारसंघात 314 मतदान केंद्रे असतील. जिल्हा प्रशासनाने 319 मतदान केंद्रे संवेदनशील तर 200 केंद्रे अतिसंवेदनशील आणि 16 मतदान केंद्रे सर्वाधिक संवेदनशील म्हणून वर्गीकृत केली आहेत.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये

निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून, प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडिओ/व्हिडिओ व इतर संदेश टाकण्यात येतात. तसेच अशा पोस्टवर इतर लोक लाइक व कॉमेन्टस् करून शेअर करतात. परंतु असे निदर्शनास आले आहे की, खोट्या बातम्या प्रसारित करणारे ऑडिओ/व्हिडिओ व संदेश सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

काही लोक व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेष बुद्धीने विरोधी उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटुंबीयांना लक्ष करून द्विअर्थी आक्षेपार्ह पोस्ट टाकत आहेत व अशा पोस्टला इतर लोक लाइक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करून शेअर करीत आहे. यावरून चंद्रपुरात नुकताच आदर्श आचारसंहिता दरम्यान समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधित इसमा विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण आपले व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स (ट्विटर) व इतर सोशल मीडियावर राजकीय पक्ष व उमेदवारबाबत वैयक्तिक व आक्षेपार्ह टीकाटिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखविणा-या पोस्ट टाकू नयेत.

कोणतेही व्हिडिओ, फोटो एडिट करून आक्षेपार्ह भासवून पोस्ट करू नये किंवा त्यास लाइक व कॉमेन्टस् करून अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करू नये. सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवण्यात यावे, अन्यथा संबंधितांविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट वर चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष आहे, असे पोलिस दलाने कळविले आहे. तर लोकसभा निवडणूक पाहता जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना जिल्हा सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT