Mumbai News : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी होणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता राज्यातील 11 मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. प्रचारासाठी रविवारी शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवाराने पदयात्रेवर भर देत जास्तीजास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
रविवारी सायंकाळी राज्यातील अकरा मतदारसंघात तर 12 राज्यातील 94 जागांचा प्रचार संपला. या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात पीएम नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit saha) तीन तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नऊ सभा पार पडल्या. त्यासोबतच ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सभेच्या निमित्तने संपूर्ण राज्य पिंजून काढले आहे. (Lok Sabha Election 2024 News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील चंद्रपूर, रामटेक, आणि वर्धा येथे त्यांनी सभा घेतल्या. तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड, परभणीत सभा घेतल्या. तिसऱ्या टप्प्यात मोदी यांनी सोलापूर सातारा, पुणे, माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथे सभा घेतल्या. अशा एकूण आतापर्यंत अकरा सभा त्यांनी घेतल्या आहेत. याशिवाय मोदी सहा मे रोजी बीडमध्ये येणार आहेत आणि दहा मे रोजी ते कल्याण आणि दिंडोरी येथे सभा घेण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सांगली, विटा व रत्नागिरीमध्ये सभा पार पडली. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सांगली, हातकणंगले, सोलापूर, पुणे, रायगड, धाराशिव, ठाणे, रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये दोनवेळा अशा एकूण नऊ सभा घेतल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी सोलापूर तर प्रियंका गांधींनी लातूरमधील उदगीरमध्ये सभा घेतली. त्यासोबतच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी-सिंधूदुर्गमध्ये एक सभा घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
७ मे रोजी बारामतीमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढत होत आहे. महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची लढत होत आहे. तर दुसरीकडे धाराशिवमध्ये दीर व भावजयीत सामना हॊणार आहे. महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष बारामती, धाराशिव मतदारसंघाकडे लागले आहे.