Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यातील महायुतीच्या घटकपक्षांची जागावाटपासाठीची बैठक सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगितले जात असले तरी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहेत. महायुतीच्या बैठकीनंतरही अद्याप कसलाच फॉर्म्युला ठरलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे समजते. त्यामुळे या मतदासंघावर आता अजित पवार गट दावा ठोकणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. या जागेवरून येत्या काळात महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
भंडारा गोंदिया मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षे खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी नेहमीच मजबूत राहिली आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा (Ncp) मतदारपण मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे ती जागा मागितल्यास त्यात काहीच वावगे ठरणार नाही. या मतदारसंघात मी अनेक कामे केली आहेत, प्रतिनिधीत्व केलंय त्यामुळे आम्ही सदैव तयार असतो. विदर्भात आम्हाला जागा हव्या आहेत, असे माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात महायुतीचे जागावाटप भाजपच्या नेतृत्वात होणार आहे. भाजपचे जास्त खासदार आणि आमदार आहेत. त्यामुळे साहजिक लोकसभेसाठी त्यांचा मोठा दावा असणार आहे. विदर्भात सगळ्यात बळकट राष्ट्रवादी ही गोंदिया भंडारा जिल्ह्यात आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या महिन्यात येऊन गेले होते. लोकसभा आणि विकासकामांचा काही संबंध नाही. विकासकाम एका दिवसात होत नाही, तर यासाठी वर्षे लागतात. तरुण पिढीला यात रोजगार पाहिजे, त्यासाठी काम होत आहे, असेदेखील प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
(Edited by Sachin Waghmare)
R...