Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule News Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election News : धाकधूक वाढली; राज्यातील भाजपचे उमेदवार ठरविणार 'हे' सहाजण

Political News : भाजपकडून देशातल्या 300 उमेदवारांची यादी 10 मार्चपूर्वी जाहीर केली जाणार आहे.

Sachin Waghmare

Bjp News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसातच पाहवयास मिळणार आहे. सर्वच जण त्याच्या तयारीत व्यस्त आहेत. लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपच्या एनडीए आघाडीने व काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. 10 मार्चपूर्वी भाजपकडून देशातल्या 300 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी भाजप मोठी कसरत करीत आहे.

दोन दिवसातच शुक्रवारी मध्यरात्री फायनल केलेल्या १०० जणांच्या नावाची यादी येणार आहे. तर दुसरीकडे उर्वरित नावावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. या मध्ये भाजपकडून मोठ्या धक्कातंत्राचा वापर केला जात असून तीन वेळा खासदार असलेल्या उमेदवारांचं तिकीट कापले जाणार असल्याची माहिती सूत्रांने दिली. पंचवीस ते तीस टक्के विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे भाजपने राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चित करण्यासाठी समिती गठीत केली आहे. या समितीत एकूण सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार आशिष शेलार यांचा समावेश आहे.

राज्यातील उमेदवारांची निवड करून ही सहा जणांची समिती नावांची छानणी करून केंद्रीय समितीकडे पाठविणार आहे. त्यानंतर राज्यातून पाठविण्यात येणाऱ्या या नावावर केंद्रीय समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातून उमेदवारांचे नावे पाठविण्याची जबाबदारी या सहा जणांवर असणार असून हे ज्या नावांची शिफारस करतील त्या पैकी एक जणांचे नाव घोषित केले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचे जागावाटप चार दिवसांत होणार

महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप (Bjp), शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्टवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाचे लोकसभेसाठीचे जागावाटप अनेक दिवसापासून रखडले आहे. त्यामुळे त्यावर येत्या चार दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची महिती सूत्रांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT