LPG cylinder rules in Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

LPG Cylinder Rules: ग्रामीण अन् शहरी भागासाठी वेगवेगळे नियम? गॅस बुकिंग करण्यापूर्वी हे नक्की वाचा!

LPG cylinder rules in Maharashtra : LPG सिलेंडर बुकिंग करण्यापूर्वी ग्रामीण आणि शहरी भागासाठी लागू असलेले नियम जाणून घ्या. गॅस सबसिडी, बुकिंग आणि वितरणासंबंधी महत्त्वाची माहिती.

Rashmi Mane

इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम आता महाराष्ट्रातील घरगुती गॅस पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी एलपीजी सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर नागरिकांनी गॅस बुकिंगसाठी गॅस एजन्सींकडे धाव घेतली आहे. या दरम्यान केंद्र सरकारने घरगुती गॅस वितरण प्रणालीत काही नवीन नियम लागू केले आहेत.

नव्या नियमांनुसार दोन सिलेंडरच्या बुकिंगमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी 21 दिवसांचा होता. तो आता 25 दिवसांचा करण्यात आला आहे. पण स्थानिक पातळीवर काही एजन्सींनी हा नियम 40 ते 45 दिवसांचा केला आहे. रत्नागिरीमधील काही एजन्सींनी ग्रामीण भागातील ग्राहकांना नवीन सिलेंडर बुक करण्यासाठी 45 दिवसांचा अवधी पूर्ण होईपर्यंत थांबायला लावले आहे. तर शहरामध्ये किमान 40 दिवसांनंतरच पुढील सिलेंडरचे बुकिंग करता येणार आहे.

केंद्र सरकारने बदललेल्या नियमांचे परिणाम अनेक जिल्ह्यांमध्ये आधीच स्पष्टपणे दिसत आहे. त्यात रत्नागिरीतील नवीन नियमांमुळे गॅस बुकिंगसाठी नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नागरिकांना मोबाईल अॅप किंवा फोनवरून बुकिंग करण्यात अडचणी येत असल्याने ते थेट एजन्सीवर जाऊन सिलेंडरची नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, आखाती भागात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठा खंडित होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक लोक आधीच गॅस मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण होऊ नये यासाठी प्रशासनालाही सतर्क राहावे लागत आहे.

अमरावती आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये गॅस वितरण करताना पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सिलेंडर वाटपाच्या वेळी गोंधळ किंवा गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी एजन्सी परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उन्हाच्या कडकडाटात अनेक नागरिक रिकामे सिलेंडर घेऊन तासन्तास रांगेत उभे असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

SCROLL FOR NEXT