

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका तरुणाने कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही विद्यार्थिनी जुन्नर शहरातील आदिवासी मुलींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहात राहत होती. ती रोजप्रमाणे सकाळी कॉलेजला जाण्यासाठी पायी निघाली होती. वसतिगृहातून बाहेर पडून ती जुन्नर ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या पत्राशेडजवळ पोहोचली असताना अचानक एक तरुण तिच्यासमोर आला. त्याने हातात असलेल्या कोयत्याने विद्यार्थिनीवर सलग वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर तिची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महेश डामसे नावाच्या तरुणाने हा हल्ला केल्याचा संशय आहे. संबंधित तरुणाने विद्यार्थिनीला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. मात्र विद्यार्थिनीने तो प्रस्ताव नाकारल्यामुळे तो संतप्त झाला. याच रागातून त्याने तिच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगितले जात आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी जुन्नर पोलिस ठाण्यात महेश डामसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले असून विविध ठिकाणी त्याचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.