LPG Crisis; Chhagan Bhujbal sarkarnama
महाराष्ट्र

LPG Crisis : दिल्लीतून महायुतीच्या मंत्र्याचा LPG बाबत मोठा इशारा; म्हणाले, "…तर तीन महिन्यांत गॅस सिलिंडर बंद होऊ शकतो!"

Chhagan Bhujbal On LPG Crisis : राज्यातील केरोसिन वितरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून जिथे LPG, PNG कमी आहे. तेथे केरोसीन वापरण्यासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Aslam Shanedivan

  1. आखाती युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त झाली आहे.

  2. छगन भुजबळ यांनी तीन महिन्यांत गॅस पुरवठा बंद होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

  3. यावर उपाय म्हणून राज्यात पीएनजी गॅस जोडण्या वाढवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

Navi Delhi News : गेल्या चार आठवड्यापासून अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरूच असून हे युद्ध अजूनही थांबलेलं नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सर्वसाम्यान्यांसह सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. अशातच आता राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी चिंता वाढवणारे वक्तव्य केलं आहे. त्यांनी, '...तर तीन महिन्यांनी कदाचित LPG गॅस बंद होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीनंतर ते शनिवारी (ता.२८) बोलत होते.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत असतानाच भारताच्या गॅस आणि तेल आयातीवर परिणाम झाला आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरसाठी लागणाऱ्या रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. तोच आता राज्यासह देशाच्या विविध भागात पेट्रोल आणि डिझेलसाठी पंपांच्या बाहेर रांगा लागताना दिसत आहेत. यावरून दिल्लीत केंद्र सरकारने बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सर्व राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. ही बैठक केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीला राज्याचे अन्न न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती.

याच बैठकीनंतर भुजबळ यांनी सर्वसामान्य लोकांची चिंता वाढवणारे वक्तव्य केले. तर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील पीएनजी गॅसच्या जोडण्या वाढवण्याची गरज व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

यावेळी ते म्हणाले, आपण केंद्र सरकारला सांगितले आहे की, पीएनजी गॅस (Pipe Gas) सध्या स्वस्त असून याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्याच्या जोडण्या वाढवल्या पाहिजेत. पण आता केंद्र सरकारच्या एका पत्रकावरून असे दिसते की, तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल. त्यामुळेच आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या वाढवल्या पाहिजेत.

जिथे जिथे पीएनजीच्या जोडण्या नाहीत तेथे याचे काम करून सुरु केले पाहिजे. सगळ्या नगरपालिकांनी पीएनजीच्या जोडण्या कराव्यात. तर ज्या प्रमाणे नगरपालिका पाण्याचं आणि वीजेचं कनेक्शन असल्यावरच इमारतींना ओसी देते तसेच पीएनजी कनेक्शनच्या सक्तीची घालावी. जोडणीनंतरच ओसी द्यावी, असेही भुजबळ म्हणाले.

24 तास परवानगी

तसेच भुजबळ यांनी PNG जोडण्या लवकर करायच्या असून विविध विभागांत PNG जोडण्यासाठी परवानग्या मागितल्या जात आहेत. त्या 24 तासांत दिल्या जातील. तर ही परवानगी पीएनजी काम करणाऱ्यांना असेल असेही भुजबळ म्हणाले.

पेट्रोल पंपावर रॉकेल

तसेच यावेळी पुन्हा एकदा त्यांनी रॉकेल (केरोसीन) बाबत भाष्य करताना, उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशामुळे आपण केरोसीन देऊ शकत नव्हतो. ते आपल्याकडे उपलब्ध आहे. याबाबत आपण उच्च न्यायालयाला कळवले असून महाराष्ट्राकडे साडेतीन हजार किलो लिटर केरोसीन आहे. आपल्याला सद्यस्थितीत केरोसीन द्यावे लागेल अशी बाजू मांडली आहे.

यानंतर न्यायालयाने जिथे LPG, PNG कमी आहे तेथे केरोसीन वापरण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी केरोसीनचे जे जुने डिलर्स आहेत, त्यांचे परवाने नुतनीकरण केले जात आहेत. त्यांनाही आता परवानगी आहे. आता केरोसीनचा पुरवठा सुरु करत असून सरकारी तेल कंपन्यांचे जे पेट्रोल पंप आहेत, तिथे सुद्धा केरोसीन मिळेल. तेथे केरोसीन टँकर ठेवून व्यवस्था करु, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

FAQs :

1. गॅस तुटवड्याचे कारण काय आहे?
आखाती देशातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत आहे.

2. गॅस पुरवठा कधी बंद होऊ शकतो?
छगन भुजबळ यांच्या मते, पुढील तीन महिन्यांत परिस्थिती गंभीर होऊ शकते.

3. याचा परिणाम कोणावर होणार आहे?
सर्वसामान्य नागरिक आणि घरगुती गॅस वापरणाऱ्यांवर याचा परिणाम होईल.

4. सरकार कोणते उपाय सुचवत आहे?
पीएनजी गॅस जोडण्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

5. सध्या गॅस उपलब्ध आहे का?
सध्या पुरवठा सुरू आहे, मात्र भविष्यात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT