Eknath Khadse -Girish Mahajan News Sarkarnama
महाराष्ट्र

Mahajan-Khadse News : मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच, तुमची अवस्था काय ? ते बघा ; खडसे-महाजन पुन्हा भिडले..

सरकारनामा ब्युरो

Monsoon Session News : जळगाव जिल्ह्यातील दोन मोठे नेते आणि बरीच वर्ष एकाच पक्षात राहिलेले एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. (Mahajan-Khadse News)एकमेकांवर टीका करण्याची संधी ते सोडत नाहीत. मतदारसंघात, जिल्ह्यात आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील या दोघांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचे दिसून आले आहे.

आज विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना शेतकऱ्यांच्या घरात पडून असलेल्या कापसाच्या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावर बोलण्याची परवानगी राष्ट्रवादीचे आमदार ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मागितली. परंतु कापसाच्या विषयावर बोलतांना त्यांनी सभागृहात उपस्थितीत असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना छेडले.

कापसाच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांनी केलेल्या उपोषणाची आठवण करून देतांना टोलेबाजी केली. शेतकऱ्यांचा ५० टक्के कापूस हा अजूनही घरात पडून आहे, तो तुम्ही सोडवा. (Monsoon Session) तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, असे बोलले जाते, पण मला वाटत नाही असा चिमटा खडसे यांनी काढला. यावर मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे असे उत्तर महाजन यांनी दिले.

यावर तसे असते तर तुम्ही आतापर्यंत जळगावचे पालकमंत्री झाला असतात, अशी कुरघोडी खडसे यांनी केली. त्यानंतर कापसाच्या प्रश्नावर सरकारच्या वतीने उत्तर देतांना महाजन यांनी खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे, कापसाचा प्रश्न गंभीरच आहे. याविषयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलले आहेत.

कापूस निर्यात व भाववाढी संदर्भात ही चर्चा झाली. त्यामुळे अधिवेशन संपण्यापुर्वीच यावर सरकारच्या वतीने ठोस घोषणा केली जाईल. त्यामुळे खडसे यांनी मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे की नाही? याची काळजी करू नये. मी मुख्यमंत्र्यांच्या जवळचाच आहे, तुमची अवस्था काय आहे? हे पहा. तुम्ही कुठे होतात आणि कुठे आलात. मतदारसंघातच तुम्ही पडले, गावची ग्रामंपचायत देखील तुमच्या ताब्यात नाही, जिल्हा बॅंकेतून तुम्ही गेलात, नगर परिषद तुमच्याकडे नाही. तेव्हा माझी चिंता करू नका, इथेही तुम्हाला मागच्या दाराने यावे लागले, असा टोला महाजन यांनी खडसेंना लगावला.

कापूस प्रश्नावर मी कडक उपोषण केले होते, पण काही जणांना माझे उपोषण सुरूच राहावे आणि मी खपावे असे वाटत होते, असा आरोप देखील त्यांनी खडसेंकडे पाहत केला. पण तेव्हा गोपीनाथ मुंडे व इतर नेत्यांनी मला उपोषण सोडायला लावले, असेही महाजन म्हणाले. महाजनांनी सभागृहात थेट हल्लाच चढवल्याने त्याला खडसेंकडून देखील प्रत्युत्तर दिले गेले. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू झाली. हा वाद सुरू झाल्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोघांनाही वारंवार शांत राहण्याची विनंती करत भाई जगताप यांची लक्षवेधी पुकारली.

परंतु महाजन- खडसे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतच होते. उपसभातींनी दोघांना ताकीद दिली पण दोघेही थांबायचे नाव घेत नव्हते. अखेर दोघांचेही माईक बंद करण्याचे निर्देश गोऱ्हे यांनी दिले. तसेच खडसे, महाजन यांना बाहेर घेऊन जा, असे विरोधी पक्षनेते दानवे यांना सुचवले. खडसे-महाजन यांच्यातील वाद आणि त्यांनी एकमेकांवर केलेले आरोप रेकाॅर्डवरून काढत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. भाई जगताप यांनी देखील तशी विनंती केली. त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरूवात झाली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT