Sudhir Mungantiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : अजबच! सरकार बदलताच मुनगंटीवार झाले ‘क्लीन’, 33 कोटी वृक्ष लागवड गैरव्यवहार प्रकरणी दिलासा

Chaitanya Machale

Mumbai News : देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यात राबविलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड या महत्वकांक्षी प्रकल्पात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आला होता.

यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने मुनगंटीवार यांना क्लीन चिट दिली आहे. या समितीचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये या मोहिमेत कोणतीही अनियमितता आढळून आली नसल्याचे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वृक्ष लागवड करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेच्या माध्यमातून 33 कोटी झाडे लावण्यात येणार होती. यापैकी अनेक ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर या मोहिमेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून यामध्ये कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वृक्ष लागवड प्रकल्पात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाल्याने एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महायुती सरकारच्या काळात मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचा सिलसिला कायम राहिला आहे. यापूर्वी देखील महायुती सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार रवींद्र वायकर यांना विविध प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे.

त्यातच आता मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या वृक्षलागवडीच्या मोहिमेत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आलेले नाही, असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने मांडले आहेत.

मुनगंटीवार यांना दिलासा देताना या चौकशी समितीने या योजनेच्या अंमलबजावणी करताना झालेल्या चुकांवर बोट ठेवले आहे. ही मोहिम राबविताना अधिकाधिक रोपे जगवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज होती, असे स्पष्ट करताना पुढील काळात या चुकांची पुनरावृत्ती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची शिफारस या समितीने केली आहे. अडीच वर्षापूर्वी राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर भाजपच्या मदतीने शिवसेनेत बंड करत 40 आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडलेले एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर ज्यांच्यावर भष्ट्राचार, गैरव्यवहाराचे आरोप झाले होते, अशा नेत्यांना क्लीन चिट देण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे.

नक्की काय आहे प्रकरण

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. या मोहिमेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत होता. राज्यात महाविकार आघाडीचे सरकार स्थापन होऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतर या योजनेत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांचे पडसाद विधानसभेत उमटले होते. त्याची गंभीर दखल घेत तत्कालीन वनमंत्री दत्ता भरणे यांनी या वृक्षलागवडीच्या चौकशीसाठी समितीची घोषणा केली होती. या समितीचा अहवाल पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात सादर करण्यात आला. या मोहिमेत कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता झाली नाही असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT