Maharashtra Shops : राज्यात आता २४ तास सर्व प्रकारची दुकानं खुली ठेवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. हाच जुनाच निर्णय असून आता केवळ त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबतचं परिपत्रक शासनानं काढलं आहे. पण दारुची दुकानं, बार आणि परिमिट रुम २४ तास खुली राहणार का? याबाबतही शासनानं परिपत्रकात स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. हा सविस्तर निर्णय काय आहे? जाणून घेऊयात.
महाराष्ट्र दुकानं व अस्थापना अधिनियम, २०१७ या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासनानं १ ऑक्टोबर २०२५ रोजी परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व दुकानं, निवासी हॉटेल, उपहारगृह, खाद्यगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाच्या किंवा करमणुकीच्या इतर जागा या गोष्टींना चोवीस तास सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अधिनियमाच्या कलम १६ (१) (ख) नुसार आठवड्यातील सर्व दिवस व्यवसाय करता येणार आहे. पण इथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला आठवड्यातून एक दिवस सुटी देणंही बंधनकारक असणार आहे. यामध्ये व्यापारी संकुले आणि मॉल्सबाबत वेळा निश्चित करण्याचे अधिकार सरकारला देण्यात आले आहेत.
दरम्यान, दारुच्या दुकानांबाबतही या परिपत्रकात महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, राज्यातील विविध क्षेत्रातील मद्य विक्री व मद्य पुरवणाऱ्या दुकानांच्या उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये परमिट रुम, बिअरबार, डान्सबार, हुक्का पार्लर, डिस्कोथेक तसंच अशी कुठलीही ठिकाणं जिथं मद्य विक्री केली जाते. तसंच वाईन आणि इतर मद्य विक्री करणारी दुकानं यांचा समावेश असून ही दुकानं ही २४ तास खुली राहणार नाहीत.
दरम्यान, इतर सर्व प्रकारची दुकानं २४ तास खुली ठेवण्याबाबतचा निर्णय जुनाच असताना स्थानिक प्रशासनाकडून अथवा पोलीस विभागाकडून दारुच्या दुकानांशिवाय इतर दुकानं २४ तास खुली ठेवण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत असल्याच्या तक्रारी आणि विविध निवेदन शासनाकडं प्राप्त झाली होती. त्याचबरोबर विविध लोकप्रतिनिधींकडून देखील याबाबतच्या तक्रारी येत असल्यानं २०१७ च्या या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेश शासनानं या ताज्या परिपत्रकातून जारी केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.