Mumbai News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शासनाने जाहीर केलेली भाऊबीज भेट संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबईतील सुमारे १० हजार २०० अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या खात्यांमध्ये यंदाची भाऊबीज भेट दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आली आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी ही माहिती दिली. यंदा दिवाळी ८ नोव्हेंबरला, तर भाऊबीज ११ नोव्हेंबर २०२६ रोजी आहे. त्यामुळे सणापूर्वीच ही रक्कम मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तयारीसाठी आर्थिक मदत होणार आहे.
राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध केला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही या निर्णयाची माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन दिवाळी सणानिमित्त ही आर्थिक भेट देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० मदतनीस कार्यरत आहेत. अशा एकूण २ लाख १४ हजार ९७ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट म्हणून दिले जाणार आहेत. या रकमेसाठी शासनाने ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने वितरित करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई येथील आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील पात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अंगणवाडी सेविका केवळ पोषण आहार वितरणापुरते काम करत नाहीत, तर महिला आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित अनेक जबाबदाऱ्या पार पाडतात. गरोदर आणि स्तनदा मातांना मार्गदर्शन करणे, सहा वर्षांखालील बालकांचे वजन-उंची मोजणे, कुपोषणाचे सर्वेक्षण करणे, बालकांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, अशा विविध कामांचा त्यात समावेश आहे.
पोषण ट्रॅकर प्रणालीवर लाभार्थ्यांची नोंदणी, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, पोषण आहार वितरणाची माहिती आणि आरोग्यविषयक जनजागृतीची जबाबदारीही त्या सांभाळतात. या कामांमध्ये अंगणवाडी मदतनीसांचाही महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांच्या या योगदानाचा सन्मान म्हणून शासनाने भाऊबीज भेट जाहीर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.