

Akola News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) असल्याचे भासवून अकोल्यातील कंत्राटदाराची तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण याला मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत असून, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
आसिफ पठाण याने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी असल्याची बतावणी केली होती. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले जवळचे संबंध असल्याचे सांगून त्याने अकोल्यातील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांचा विश्वास संपादन केला.
ओबेरॉय यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सुमारे ५० कोटी रुपयांची देयके प्रलंबित होती. ही देयके मंजूर करून देण्याचे आमिष आरोपीने दाखविले. त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्याने कंत्राटदाराकडून पैशांची मागणी केली. शासकीय देयके मंजूर होण्याच्या अपेक्षेने कंत्राटदाराने आरोपीला टप्प्याटप्प्याने एकूण ३ कोटी २५ लाख रुपये दिल्याचा आरोप आहे.
१० सप्टेंबर रोजी आरोपीने कंत्राटदाराला मुंबईत बोलावून घेतले. यावेळी कथित साथीदारामार्फत १ कोटी २५ लाख रुपये स्वीकारण्यात आले. त्यानंतर आणखी दोन कोटी रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढी मोठी रक्कम स्वीकारल्यानंतरही आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराला संशय आला.
३० सप्टेंबर रोजी रणजीतसिंग ओबेरॉय यांनी मंत्रालयात जाऊन आरोपीच्या पदाबाबत चौकशी केली. मात्र, संबंधित व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात किंवा मंत्रालयात अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आसिफ पठाण याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त होत आहे. प्रलंबित देयके मंजूर करून देण्याच्या नावाखाली आरोपीने संबंधित अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता का, प्रत्यक्षात या अधिकाऱ्यांशी त्याचे काही आर्थिक किंवा प्रशासकीय संबंध होते का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावाचा गैरवापर करून कोट्यवधींची फसवणूक झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे केवळ आर्थिक फसवणूक होती की मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करण्याचा अन्य काही हेतू होता, याचा उलगडा पोलीस तपासातून होण्याची अपेक्षा आहे.
या संपूर्ण फसवणूक प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अकोल्यातील कंत्राटदाराची सुमारे ५० कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याची माहिती आरोपीला नेमकी कशी मिळाली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या देयकांच्या मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता का, तसेच आरोपीचे या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध होते का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
आरोपीने मुख्यमंत्री कार्यालयातील ओएसडी असल्याची बतावणी करून कंत्राटदाराचा विश्वास संपादन केला. मात्र, या फसवणुकीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी प्रत्यक्ष सहभागी होते की त्यांच्या नावाचा केवळ गैरवापर करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित दोन अधिकाऱ्यांची भूमिका, आर्थिक व्यवहार आणि आरोपीशी असलेले संभाव्य संबंध तपासातून स्पष्ट होणार आहेत. या प्रकरणाचा तपास केवळ अटक केलेल्या आरोपीपुरता मर्यादित न ठेवता, संभाव्य साथीदार आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेतील व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.