Mumbai News : सरकार कोणाचे येणार? मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर वेगवेगळी विधान समोर येत आहेत.
महायुतीमधील सत्तेत असलेल्या प्रमुख तिघा नेत्यांनी सध्या तरी दिलदारपणा दाखवत मुख्यमंत्री पदावर उत्सुक नसल्याचे सांगत आहेत. तर महाविकास आघाडीत एकत्र बसून निर्णय होईल, असे सांगितले जात आहे. यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. त्यांचे हे विधान 'मविआ'साठी सूचक, असे मानले जात असले, तरी राज्यात त्यांच्या विधानावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून बराच खल सुरू आहे. महाविकास आघाडीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, त्याला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा असेल, अशी भूमिका घेतली होती. त्यावर महाविकास आघाडीत मौन बाळगलं गेले होते. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाने यावर सावध भूमिका घेतली आणि शांत राहिले. पुढे-पुढे निवडणुकीनंतर महाविकास आघाडी बसून निर्णय घेऊ, अशी भूमिका घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी कालच्या मुलाखतीत, हीच भूमिका बोलावून दाखवली.
काँग्रेसमध्ये देखील मुख्यमंत्री पदाबाबत चढाओढ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून मात्र सध्या तरी मुख्यमंत्री पदाचा निर्णय शरद पवार जाहीर करतील. त्यांनी पहिल्यापासून मुख्यमंत्री पदाबाबत रस नसल्याचे सांगून, जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यावर भर दिला आहे.
महायुतीमध्ये भाजप (BJP) नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, असे सूचक संकेत दिले. निवडणुका जाहीर होताच, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, यासाठी काहींनी नवस केले. अजित पवार यांची देखील मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या तिघा नेत्यांनी मुख्यमंत्री पदात रस नसल्याचे सांगितले. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून बराच खल होणार असे दिसते.
महाविकास आघाडी आणि महायुतीत, मुख्यमंत्री पदावरून अशा चर्चा होत असतानाच, मविआचे नेते शरद पावर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सूचक विधान केले. सातारा इथल्या वाईमधील सभेत शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. शरद पवार या सभेत म्हणाले, "राज्यात आमच्या काळात महिलांना 30 टक्के आरक्षण दिले. पुढे हा निर्णय संपूर्ण देशात लागू झाला. ग्रामपंचायतीपासून तो लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी, आणि ते पाहण्याची इच्छा आहे".
शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे 'मविआ'ला सूचक असे संकेत मिळाले आहेत. तसेच राजकीय चर्चांना उधाण देखील आले आहे. मविआचे सरकार आल्यावर हा निर्णय होऊ शकतो, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह 'मविआ'तील अन्य महिला नेत्यांची नाव चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.