Mahavikas Aghadi, Mahayuti Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election : ‘हा’ सर्व्हे महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणार; ‘मविआ’ला पाच झोन मिळवून देणार सत्ता...

Lok Poll Mahayuti Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे.

Rajanand More

Mumbai : महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीच्या नेत्यांची झोप उडवणारा एक सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, राज्यातील सहापैकी चार झोनमध्ये महाविकास आघाडी बाजी मारत असल्याचे दिसते. तर महायुतीला केवळ एकाच झोनमध्ये आघाडी असून एका झोनमध्य युती आणि आघाडीला सारख्याच जागा मिळताना दिसत आहेत.

‘लोक पोल’च्या ताज्या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येऊ शकते. एनडीएला केवळ 115 ते 128 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर आघाडी 141 ते 154 जागांपर्यंत मुसंडी मारेल, असे या सर्व्हेतून पुढे आले आहे. इतर पक्ष किंवा अपक्षांना पाच ते 18 जागा मिळू शकतात.

मतांच्या टक्केवारीमध्ये फारसे अंतर नसेल. महायुतीची टक्केवारी 38 ते 41 आणि आघाडीची 41 ते 44 टक्के असेल. या सर्व्हेमध्ये सुमारे दीड लाख लोकांचा समावेश असल्याचा दावा लोक पोलने केला आहे. जवळपास एक महिने हा सर्व्हे सुरू होता. सर्व्हेसाठी विदर्भ, खान्देश, ठाणे-कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असे सहा झोन करण्यात आले होते.

कोणत्या झोनमध्ये कुणाला आघाडी?

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला विदर्भात फटका बसू शकतो. विदर्भातील 62 पैकी केवळ 15 ते 20 जागा महायुतीला तर 40 ते 45 जागा आघाडीला मिळतील, असे सर्व्हेमध्ये म्हटले आहे. मराठवाड्यातही आघाडीचाच वरचष्मा राहू शकतो. येथील 46 पैकी 25 ते 30 जागा आघाडीला मिळू शकतात. तर युतीला 15 ते 20 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातही आघाडीच

विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतही आघाडी आपली ताकद दाखवून देऊ शकते. मुंबईतील 36 पैकी सर्वाधिक 20 ते 25 जागा आघाडीला आणि 10 ते 15 जागा युतीला मिळतील, असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 20 ते 25 जागा युतीला आणि 30 ते 35 जागा आघाडीला मिळू शकतात.

कोकणात युती

महायुती केवळ ठाणे आणि कोकणात सरस ठरताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळाले. या झोनमधील 39 पैकी तब्बल 25 ते 30 जागा युतीला मिळू शकतात. तर आघाडीला केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावे लागू शकते. खान्देशात मात्र युती आणि आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. प्रत्येकी 20 ते 25 जागांचा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT