Mahavikas Aghadi, Mahayuti Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : मराठवाड्यात चालणार 'मराठा पॅटर्न', विदर्भ, मुंबईत कोणता मुद्दा मतं फिरवणार?

Maharashtra Assembly Election 2024 Lok Poll Survey : लोक पोलने केलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीची सतत येणार असल्याचे चित्र आहे. तर महायुतीचे मोठे नुकसान होऊ शकते.

Rajanand More

Mumbai : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला. निवडणुकीच्या निकालात ते स्पष्टपणे दिसून आले. विधानसभेतही जवळपास तसेच चित्र राहणार असल्याचे एका सर्व्हेतून समोर आले आहे. मराठवाड्यात तरी मराठा पॅटर्नचा महाविकास आघाडीलाच सर्वाधिक फायदा होईल, असा अंदाज सर्व्हेतून वर्तवण्यात आला आहे.

'लोक पोल'ने केलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा तर महायुतीला 115 ते 128 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी मतांच्या टक्केवारीत फारसे अंतर नसेल. अनुक्रमे 41 ते 44 आणि 38 ते 41 टक्के मते मिळू शकतात, असा कौल सर्व्हेमध्ये आला आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे-कोकण आणि मुंबई असे सहा झोनमधून सर्व्हे करण्यात आला आहे. प्रत्येक झोनमध्ये कोणता मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरणार, हेही सर्व्हेतून समोर आले आहे. त्यानुसार मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजेल, अशी शक्यता आहे. मराठा समाज आघाडीच्या बाजूने उभा राहील, असे सर्व्हेत म्हटले आहे. तर शेतकऱ्यांच्या रोषालाही महायुतीला सामोरे जावे लागू शकते.

एससी, एसटी मतदारांची नाराजी

विदर्भात लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही काँग्रेसला सर्वाधिक पसंती मिळेल. त्यामध्ये एससी आणि एसटी मतदार तसेच ग्रामीण भागातील मते महत्वाचा फॅक्टर ठरू शकतात. सोयाबीन आणि कापसाच्या भावावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी मतांवर परिणाम करू शकते, असेही सर्व्हेतून पुढे आले आहे.

कांदा महत्वाचा मुद्दा

खान्देशातील एसटी बेल्टमध्ये आघाडी मते खेचू शकते. तर उर्वरित भागात मजबूत नेतत्व आणि आरएसएसच्या प्रभावामुळे एनडीएला अधिक मते मिळतील. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारवरील रागही मतपेटीतून बाहेर येईल, असे सर्व्हेमध्ये दिसते.

नेतृत्वाचा अभाव

ठाणे आणि कोकणात नेतृत्वाच्या अभावाचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. त्याचा थेट फायदा महायुतीला होईल. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही भागातील प्रभावामुळे आघाडीला किमान अस्तित्व दाखवता येईल, अशी कोकणातील स्थिती असल्याचे सर्व्हेमध्ये दिसते.

शरद पवारांची जादू चालणार

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांची जादू पुन्हा चालणार असल्याचे दिसते. बारामती-सातारा पट्ट्यातील मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात. तर कोल्हापूर-सोलापूरमध्ये काँग्रेस वरचढ ठरू शकते, असे सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

मुंबईत ठाकरेंचा करिष्मा

मुंबईत उध्दव ठाकरे यांचा करिष्मा विधानसभेतही दिसू शकतो. त्यांना काँग्रेसच्या मुस्लिम व एससी व्होटबँकेचा मोठा फायदा होईल. श्रीमंत विरुध्द गरीब असा वेगळा पॅटर्नही पाहायला मिळू शकतो. काँग्रेसच्या जागा वाढू शकतात. तर गुजराती मतदारांमध्ये भाजप लोकप्रिय पक्ष ठरेल, असे सर्व्हेतून समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT