Mumbai Election News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर आता छाननी आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. पण त्याआधी तिकीट वाटपात काही विद्यमान आमदारांना नारळ देण्यात आला आहे.
विद्यमान आमदारांना घरी बसवणाऱ्या पक्षांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप आपल्या आठ आमदारांना उमेदवारी दिलेली नाही. त्यापाठोपाठ काँग्रेसचा क्रमांक लागतो. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेल्या पाच आमदारांना तिकीट देण्यात आलेले नाही. त्यातील काही आमदार इतर पक्षांतून निवडणुकीत उतरले आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन आमदारांना तिकीट दिलेले नाही. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने दोन विद्यमान आमदारांना सोडल्यास सर्वांना उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून केवळ एका विद्यमान आमदाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही.
बोलीवली मतदारसंघात आमदार सुनील राणे यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आर्णीचे आमदार संदीप धुर्वे आणि उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आर्वीचे आमदार दादाराव केचे, नागपूर मध्यचे विकास कुंभारे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि वाशिमचे आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
श्रीरामपुरातील लहू कानडे, रावेरमधील शिरीष चौधरी यांना तिकीट मिळालेले नाही. तर अमरावतीच्या सुलभा खोडके आणि इगतपुरीचे हिरामण खोसकर हे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माढ्यातील विद्यमान आमदार बबनराव शिंदे यांना उमेदवारी दिलेली नाही. तसेच अर्जुनी मोरगांवचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांचेही तिकीट कापले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार अनिल देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आयत्यावेळी त्यांच्याऐवजी पुत्र सलील यांना उमेदवारी देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा आणि चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांना तिकीट दिले नाही. उमेदवारी न मिळाल्याने वनगा यांनी रडू कोसळले होते. त्यानंतर ते काही तांस नॉट रिचेबल होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्याकडे आलेल्या सर्व विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.