Maharashtra BJP News  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra BJP News : शिंदेंची सेना, अजितदादांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात मोदींचाच आधार...

Jagdish Pansare

Mahayuti Political News : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्याच्या काल लागलेल्या निकालाचा महाराष्ट्रातील राजकारणावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीची सत्ता घालवण्यासाठी भाजपने आधी शिवसेना फोडली. (Maharashtra BJP News ) सोबत आलेल्या 40 आमदारांवर टांगती तलवार असल्याचे लक्षात येताच सरकार पडू नये यासाठी राष्ट्रवादीला सुरूंग लावत अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना सत्तेत घेऊन महत्वाची मंत्री पद दिली. तीन पक्षांचे सरकार चालवतांना भाजपला काहीवेळा तडजोडी कराव्या लागल्या.

मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्या भाजपमधील अनेकांना आपल्या इच्छा-आकांक्षांवर पाणी सोडावे लागले. पण शिंदे-अजित पवार गटाप्रमाणे भाजपमधील नाराजी कधी बाहेर आली नाही. तीन राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर आता भाजप शिंदेंची शिवसेना (Shivsena) आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लाड काहीसे कमी करेल, असे बोलले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच मान्य केला आहे.

त्यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर नसतांना केवळ मोदींच्या नावावर भाजपने सत्ता मिळवली. (Eknath Shinde) त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात 106 आमदार हातीशी असूनही तडजोडीच्या भूमिकेत असलेल्या भाजपला आता बुस्टर डोस मिळाला आहे. भाजपच्या नेत्यांकडून आपल्याला हवं ते मिळवून घेण्यासाठी दबाव तंत्र वापरणाऱ्या (Ajit Pawar) अजित पवारांनाही आता नरमाईचे धोरण स्वीकारावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासूनच भाजपच्या प्रभावाखाली काम करतांना दिसले. राज्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपला बहुमत असतांना राष्ट्रवादीची सरकारमध्ये झालेली एन्ट्री यावरून ते स्पष्टही झाले. पक्षातील मंत्रीपदासाठी इच्छूक असलेल्यांची समजूत काढतांना त्यांच्या नाकीनऊ आले, पण भाजपच्या राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वावर दबाव टाकणे शिंदेंना शक्य झाले नाही.

येत्या सहा महिन्यात लोकसभेच्या आणि त्यानंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांच्याविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेमध्ये शिंदेसोबत असलेल्या अनेक खासदार आणि आमदारांचे मतदारसंघ धोक्यात आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती त्या तुलनेत काहीसी बरी आहे. असे असले तरी तीन राज्यातील विजयानंतर महाराष्ट्रात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही पंतप्रधान मोंदीच्या चेहऱ्याचा आधार घ्यावा लागणार असे दिसते.

राज्यात मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पेटला असला तरी भाजपमधील चाणक्य यावर निवडणुकीपुर्वी निश्चित तोडगा काढतील. अशावेळी या निर्णयाचा फायदा भाजपसोबतच मित्र पक्षांनाही होणार आहे. अजित पवार यांनी तर जाहीरपणे देशाला मोदींच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नसल्याचे कबुल केले आहे. एकनाथ शिंदे यांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तीन राज्यात भाजपचा विजय झाला असला तरी ते महाराष्ट्रात पराभूत होतील असे भाकित केले आहे. तीन राज्यातील मोदी करिश्म्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी आणि देशपातळीवरील इंडियाची मोट बांधण्याआधीच सुटू नये, यासाठी केलेले हे वक्तव्य असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे ठाकरे गटाने भाजपला मोदी लाट असेल तर महाराष्ट्रात आताच निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान पुन्हा एकदा दिले आहे. आज नाही, पण सहा महिन्यांनी लोकसभा आणि त्यांनतरच्या विधानभा निवडणुका भाजपला टाळता येणार नाहीच. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आव्हानात खरंच तथ्य आहे, की मग ते भाजप, शिंदे व अजित पवार गटाविरोधात वातावरण असल्याचा आव आणत होते हे स्पष्ट होणारच आहे. तीन राज्यातील विजयामुळे भाजप मात्र जोशात असणार आहे, यातून आता प्रामुख्याने शिंदे गटाच्या राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तीन राज्यातील विजयाचे साईड इफेक्ट भाजपच्या मित्र पक्षांवर निश्चितच दिसतील.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT