Devendra Fadnavis, Gautam Adani Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : शपथविधीनंतर पाच दिवसांतच अदानी फडणवीसांच्या भेटीला; काय आहे कारण?

Dharavi Redevlopment Project : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने धारावी पुनर्विकासाच्या मुद्यावरून महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता.

Rajanand More

Mumbai News : उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित लाच प्रकरणावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही काँग्रेस नेते राहुल गांधींनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पुढे करत अदानी आणि महायुती सरकारला घेरले होते. आता पुन्हा एकदा अदानी चर्चेत आले आहेत.

निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पाच नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पाच दिवसांतच उद्योगपती अदानी यांनी मंगळवारी फडणवीसांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाल्याचे समजते.

अदानी हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फडणवीसांच्या भेटीला आले होते. दोघांमध्ये एक ते दीड तास चर्चा झाल्याचे समजते. मात्र, त्याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. दोघांच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्दयावर चर्चा झाली असावी, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर ही पहिलीच भेट असल्याने सदिच्छा भेटही असू शकते, अशीही चर्चा आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडीने अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कनेक्शनवरून जोरदार टीका केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून पंतप्रधान मोदी व महायुती सरकारला धारेवर धरले होते. अदानींना मोदींचे संरक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला होता. धारावीची जागा अदानींच्या घशात घातली जात असल्याचेही ते म्हणाले होते. तर उद्धव ठाकरेंनी सत्ता आल्यास हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

यापार्श्वभूमीवर अदानी आणि फडणवीसांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. धारावी हा मुंबईसाठी महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे अदानींकडे महाराष्ट्रातील इतर काही प्रकल्पही प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांबाबतही दोघांच्या भेटीत चर्चा झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT