CM Eknath Shinde With MPs Sarkarnama
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : शिंदेंना खासदार फुटण्याची भीती; ‘इंडिया’पासून लांब राहण्याची ताकीद

Rajanand More

Mumbai : शिवसेनेत बंड पुकारून भाजपच्या 'महाशक्ती'सोबत हातमिळवणी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता राजकीय फासे उलटल्यावर मात्र, 'फुटी'च्या भीतीने धडकी भरवल्याचे दिसत आहे. अशातच शिंदेंचे खासदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याच्या कंड्या पिकवल्या जात आहेत. त्यामुळे शिंदेसेना अलर्ट झाली असून, नव्या सात खासदारांना वर्षावर बोलावून, त्यांना 'इंडिया'च्या नेत्यांच्या सपंर्कात न राहण्याची ताकीद देण्यात आली आहे.

राजकीय पडझडीचे अंदाज बांधून असलेल्या शिंदेंनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे आम्हीच शिवसेना म्हणून आव आणणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला आता आपल्या नव्या खासदारांवर लक्ष ठेवावे लागत आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आले आहेत. शिंदेंपेक्षा हा आकडा दोनने जास्त आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे 30 खासदार निवडून आल्याने महायुतील सर्व पक्षांची काळजी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीआधी आमदारांनी आघाडीत उड्या मारण्याची भीती शिंदेंच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याआधी शिंदेना आपल्या खासदारांची काळजी वाटू लागली आहे.

दरम्यान, एनडीएची बुधवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदेही उपस्थित होते. एनडीएमध्ये भाजपला सर्वाधिक 240 जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल आंध्र प्रदेशचे भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला 16 जागा मिळाल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला 12 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साता जागा आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये शिंदेंचे वजन वाढले आहे. भाजपने स्वबळावर बहुमताचा आकडा गाठला नसल्याने या मित्रपक्षांना दुखवून चालणार नाही. त्यासाठी त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

शिंदेंच्या पदरात एखादे कॅबिनेट आणि एक-दोन राज्यमंत्रिपदं मिळण्याची दाट शक्यता आहे. ही मंत्रिपदं कुणाला द्यायची, याचा विचारही त्यांना करावा लागणार आहे. त्यांच्याकडे आता श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि प्रतापराव जाधव हे अनुभवी खासदार आहेत. त्यांच्यातून मंत्रिपदांसाठी कुणाची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT