Congress News : महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीला नुकतीच बैठक झाली. या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह सर्वच प्रमुख नेते दिल्लीला गेले होते. पण या नेत्यांचा हा दिल्ली दौरा बिनकामाचाच ठरला. कारण या पूर्वनियोजित बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा सरचिटणीस वेणुगोपाल यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे बैठकीला गेलेले नेते नाराज होऊन माघारी परतले.
काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची पक्ष संघटना, आगामी निवडणूक आणि संभाव्य आघाडी अशा विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी ही बैठक बोलावली असल्याचा निरोप नेत्यांना देण्यात आला होता. त्यानुसार काँग्रेसचे जुने मुख्यालय 24 अकबर मार्ग येथे बैठक झाली. पण बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी किंवा वेणुगोपाल यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. मग श्रेष्ठींच्याअनुपस्थितीत प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच चर्चा केली.
पक्ष संघटना, आगामी निवडणूक आणि त्यासाठी संभाव्य आघाडी यासारख्या स्थानिक मुद्दयांवर चर्चा झाली. शिवाय तिरंगा यात्रा, संविधान यात्रा अशा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त पक्षाचेच कार्यकर्ते येता. त्यामुळे सर्वसामान्यांना काँग्रेसशी जोडण्यासाठीही कार्यक्रम घ्यावा अशी मागणी करण्यात आली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कर्नाटकमधील वाद संपवून दिल्लीत आल्यानंतर त्यांची औपचारिक भेट घेऊन आणि त्यांच्यासमवेत फोटो काढून नेते राज्यात परत गेले. माघारी फिरताना काँग्रेसचे उपस्थित जवळपास सर्वच नेते उद्विग्न झाले होते.
प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षच बैठक घेणार असतील तर ती मुंबईतही होऊ शकली असती. दिल्लीत घेण्याची गरज काय होती? असा सवाल एका नेत्याने उपस्थित केला. अन्य एका नेत्याने बैठक कशासाठी बोलावली होती हे कळलेच नाही, अशी टिप्पणी केली. शिवाय महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असताना सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार असे नेते दिल्लीत असतील तर काँग्रेस अधिवेशनाबद्दल गंभीर नाही हा संदेश जातो. महत्त्वाचे म्हणजे पक्षाचे विधिमंडळातील नेते अशा बैठकीसाठी दिल्लीत आले, ज्या बैठकीला केंद्रीय नेतेच नाहीत, अशी उद्विग्नताही एका नेत्याने बोलून दाखविली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.