Heavy rain impact on Maharashtra dams Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Dams : तुफान पाऊस, पण धरणांतील आजचा पाणीसाठा पाहून भरेल धडकी; तुमच्या भागातील धरणांची काय स्थिती? वाचा विभागनिहाय आकडेवारी...

Maharashtra dam water storage latest update : राज्यात सर्वाधिक धरणे असलेल्या संभाजीनगरमधील धरणांमधील साठा मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास १४ टक्क्यांनी कमी आहे.

Rajanand More

Maharashtra Rain Update 2026 : राज्यात कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागांत सध्या तुफान पाऊस सुरू आहे. नद्या दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठी झपाट्याने वाढत आहे.

मात्र, असे असले तरी राज्यातील अनेक धरणांतील पाणीसाठ्याची सध्याची स्थिती चिंताजनक आहे. एक-दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरून जुलैच्या अखेरच्या पंधरवड्यात ओढ देण्याची शक्यता आहे. तसेच यापूर्वीच एल निनोच्या सावटामुळे महाराष्ट्रासह देशात कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मागील पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणांमधील पाण्यासाठी वाढ झाली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता म्हणता येईल. सध्या कोसळत असलेला पाऊस पुढेही कायम राहील, याची शाश्वती नाही. हवामान विभागाने एल निनोचे सावट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या पाणीसाठ्यात होत असलेली वाढ दिलासादायक असली तरी मागील वर्षीचा विचार केल्यास भीतीदायकही आहे.

राज्यातील ८ जुलैपर्यंतचा काही धरणांमधील पाणीसाठा तर धडकी भरविणारा आहे. केवळ अमरावती आणि नागपूर विभाग वगळता अन्य चार विभागांमधील धरणांतील पाणीसाठा मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.

अमरावतीतील २७६ धरणांमध्ये ४१.९३ टक्के पाणीसाठा आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत हा एक टक्क्यांनी अधिक आहे. नागपूरमध्येही हीच स्थिती आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक आणि कोकण विभागाने राज्याची चिंता वाढविली आहे.

राज्यात सर्वाधिक धरणे असलेल्या संभाजीनगरमधील धरणांमधील साठा मागीलवर्षीच्या तुलनेत जवळपास १४ टक्क्यांनी कमी आहे. सध्या केवळ २४.९८ टक्के साठा आहे. कोकणातील साठा १५ टक्क्यांनी नाशिकमधील सुमारे २१ टक्क्यांनी तर पुणे विभागातील तब्बल २८ टक्क्यांनी कमी आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. मात्र, हा पाऊस सर्वत्र नाही.

मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांसह सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. एल निनोचे सावट असूनही सध्या अनेक भागात मुसळधार सुरू असली तरी राज्यातील धरणे तुडूंब भरण्यासाठी मान्सूनची संपूर्ण पावसाळ्यात कृपादृष्टी असावी लागणार आहे.

सध्याचा आणि मागील वर्षीचाआजच्या दिवसाचा धरणांतील पाणीसाठा (टक्के), कंसात धरण संख्या -

अमरावती (276) - 41.93, 42.96

छत्रपती संभाजीनगर (929) - 24.98, 38.82

कोकण (174) - 55.98, 70.21

नाशिक (539) - 34.23, 55.30

पुणे (724) - 38.45, 66.87

नागपूर (387) - 37.79, 36.82

एकूण (3029) - 37.28, 54.71

(माहिती स्त्रोत - जलसंपदा विभाग)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT