Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार की महाराष्ट्रातच..? फडणवीसांनी तीन शब्दांत विषय संपवला...

BJP National President Maharashtra Politics : भाजपला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेत. या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा असल्याचे बोलले जात आहे.

Rajanand More

Mumbai : राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार, अशी जोरदार चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर फडणवीसांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.

फडणवीसांनी एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत बोलताना राजकारणातील अनिश्चितेवरही भाष्य केले. तुमच्याविषयी बरेच तर्क लावले जातात. तर पुढील काही दिवसांत असेच काही तुमच्याबाबतीत पाहायला मिळेल का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता.

त्यावर फडणवीस यांनीही गुगली टाकत उत्तर दिले. ते म्हणाले, राजकारणात अनिश्चितता निश्चित आहे. त्यामुळे उद्या काय होणार, हे कुणाला माहिती नाही. तुम्हाला काय पाहायला मिळणार, 2019 मध्ये तुम्ही तुम्ही काय विचार केला होता आणि काय दिसलं, 2022 मध्ये काय दिसलं, 2022 च्या शेवटी काय पाहायला मिळालं?

राजकारणात असे सगळे होत असल्याचे सांगताना फडणवीसांनी प्रश्न कशाच्या संदर्भाने आहे, हे आपल्याला कळाल्याचे सांगितले. तसेच त्याचं उत्तर त्यांनी तीन शब्दांतच दिले. मी इथेच आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणातच राहणार असल्याचे संकेत दिले.

दरम्यान, जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात भाजपला नवीन अध्यक्ष मिळू शकतात. त्याआधी राज्यातील विविध समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले आहे. राज्यात पुढील काही दिवसांत विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.

पुण्यात झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात नेत्यांनी महायुतीमध्ये राहूनच निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याचे एकाही नेत्याने म्हटलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT