Maharashtra Election : नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी होऊ नये म्हणून काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. मात्र, नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत.
राजुरा येथे भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, भद्रावती येथे शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे. डोहे हे शिंदे सेनेत दाखल झाले, तर नामोजवार यांनी काँग्रेसचा हात पकडला आहे. यासोबतच गडचांदूर येथेसुद्धा बंडखोरी होण्याची शक्यता आहे. बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान भाजपच्या स्थानिक नेत्यांसमोर आहे.
सुनील नामोजवार यांच्या रुपाने भद्रावती नगरपालिका निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. शहराचे पहिले नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. नगर परिषदेच्या स्थापनेनंतर १९९८ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत नामोजवार हे शिवसेनेकडून नगराध्यक्षपदी आरुढ झाले. त्यानंतर दोनवेळा नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. चार वर्षांपूर्वी ते भाजपमध्ये दाखल झाले होते.
सध्या नामोजवार हे भाजपचे शहराध्यक्ष होते. पण यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून प्रचंड नाराजी व्यक्त करत शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रारंभी, नामोजवार हे भाजपकडून नगराध्यक्षपदाचे मजबूत दावेदार मानले जात होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्जही दाखल केला होता.
मात्र, अनिल धानोरकर यांच्या भाजप प्रवेशानंतर पक्षश्रेष्ठींनी धानोरकर यांनाच पसंती दिल्याचे स्पष्ट झाल्याने नामोजवार यांनी राजीनामा दिला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नामोजवार यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करीत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भद्रावतीत पुन्हा एकदा अनिल धानोरकर विरुद्ध सुनील नामोजवार असा थेट सामना रंगणार आहे.
भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, आज ते नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेनेने डोहे यांच्यासह शिंदे गटाने १० प्रभागांतून २१ उमेदवार निश्चित केले आहेत.
भाजपतून आधीच नाराज असलेले माजी आमदार ॲड. संजय धोटे आणि सुदर्शन निमकर यांच्यानंतर आता राजेंद्र डोहे यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित झाली आहे.
काँग्रेस-शेतकरी संघटनेचे अरुण धोटे यांनी आधीच अर्ज दाखल केला असून, भाजपाने मात्र अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्या भाजपकडून राधेश्याम आडाणी यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्यासमोर पक्षातील अंतर्गत दुफळी दूर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. डोहे यांनी भोंगळे यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका करत शिंदे गटाचा हात धरला आहे. या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलले असून, भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजुरा येथे काँग्रेस-शेतकरी संघटनेने आघाडी करून भाजप समोर मोठे आव्हान उभे केले आहे. माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे आमदार देवराव भोंगळे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरविताना मोठी काळजी घ्यावी लागत आहे. अशात आज भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजिनामा देत शिंदे सेनेचे धनुष्यबाण हाती घेतले आहे. तर, दुसरीकडे आमदार भोंगळे आणि भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याची चर्चा राजुरा शहरातील राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.