Young farmer Ashok Mane speaks to Agriculture Minister Dattatray Bharane from his farm, highlighting the demand for a farmer loan waiver amid drought and crop losses in Maharashtra. Sarkarnama
महाराष्ट्र

Dattatray Bharne : लग्न जुळत नसल्याने तरूण शेतकऱ्याचा थेट कृषीमंत्री भरणेंना फोन; म्हणाला, "पाऊस नाही, पिके नाहीत..."

Beed farmer calling Dattatray Bharne : शेतीतील अनिश्चित उत्पन्न, वाढते कर्ज आणि आर्थिक अस्थिरता यामुळे अनेक पालक शेतकऱ्यांना मुली देणं टाळत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. याच सामाजिक आणि आर्थिक चिंतेतून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या.

Jagdish Patil

Beed News, 13 Jul : राज्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये सध्या तरुणांची लग्न जुळण्यात मोठ्या अडचणी येत असल्याचं चित्र आहे. विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांतील तरुणांना वधू मिळणे कठीण होत चालल्याची प्रकरणे समोर येत आहेत.

शेतीतील अनिश्चित उत्पन्न, दुष्काळ, वाढते कर्ज आणि आर्थिक अस्थिरता यामुळे अनेक पालक शेतकऱ्यांना मुली देणं टाळत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे. याच सामाजिक आणि आर्थिक चिंतेतून बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अशोक माने या तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्यथा मांडल्या.

सलग तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर रविवारी अखेर अशोक माने यांचा कृषिमंत्र्यांशी संपर्क झाला. यावेळी त्यांनी आष्टी परिसरातील दुष्काळी परिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान आणि त्याचे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होत असलेले गंभीर परिणाम मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

माने यांनी सांगितले की, यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, हा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे सामाजिक परिणामही आता प्रकर्षाने जाणवत आहेत.

"पाऊस नाही, पिकं नाहीत. त्यामुळे मुलांची लग्नंदेखील जमत नाहीत. शेतीची परिस्थिती पाहून मुलींची कुटुंबेही मागे हटतात. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी," अशी मागणी अशोक माने यांनी दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली.

या तरूणाशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, "राज्यात सुमारे ४० हजार कोटी रुपयांची मोठी कर्जमाफी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कोणतीही निवडणूक समोर नसताना हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत.

या कर्जमाफीमुळे सर्वच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे नाही. शेतकरी आजही अडचणीत आहेत. मी स्वतःही शेतकरी असल्याने त्यांची वेदना समजू शकतो," असेही भरणे यावेळी म्हणाले. दरम्यान, अशोक माने आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यातील हा संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT