New Labour Law Update : Sarkarnama
महाराष्ट्र

New Labour Law Update : कामगारांची चांदी; राज्य सरकारची मोठी घोषणा; आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम! कामगारांना मिळणार 3 दिवसांची भरपगारी सुट्टी

State government big decision for workers : राज्य सरकारचा मोठा निर्णय – आता आठवड्यात फक्त ४ दिवस काम आणि ३ दिवसांची भरपगारी सुट्टी. कामगारांसाठी दिलासादायक घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Rashmi Mane

राज्यातील कामगारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या नियमांनुसार कामगारांना आठवड्यात 48 तास काम करावे लागणार असले तरी त्यांना सलग 3 दिवसांची भरपगारी सुट्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे कामाचे नियोजन अधिक लवचिक होणार असून कामगारांना वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक वेळ देता येणार आहे.

नवीन प्रस्तावानुसार कामगारांनी 3 किंवा 4 दिवसांत एकूण 48 तासांची कामाची मर्यादा पूर्ण करायची आहे. उदाहरणार्थ, दररोज 12 तास काम केल्यास 4 दिवसांत 48 तास पूर्ण होतील आणि त्यानंतर पुढील 3 दिवस सुट्टी घेता येईल. मात्र कामाचे तास आणि वेळापत्रक हे कामगार व नियोक्ता यांच्या परस्पर संमतीने निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे उद्योगानुसार लवचिकता राखली जाणार आहे.

सध्या देशात आठवड्याला 48 तास कामाची कमाल मर्यादा लागू आहे. सरकारने दररोज 12 तास काम करण्याची तरतूद सुचवली असली तरी काही कामगार संघटनांनी यावर आक्षेप घेतला आहे. तरीही आठवड्याची 48 तासांची मर्यादा कायम ठेवून कामकाज अधिक सुलभ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इंग्लंड, फ्रान्स आणि जपानसारख्या देशांमध्ये अशा प्रकारची कार्यपद्धती अमलात आहे आणि त्याच धर्तीवर हा बदल करण्यात येत आहे.

वेतन संहितेतही महत्त्वाचे बदल प्रस्तावित आहेत. कामगारांना ठरलेले वेतन वेळेत न दिल्यास संबंधित नियोक्त्यावर 50,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी देण्यात येणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक असेल. ज्या कंपन्यांमध्ये महिला कामगार असतील, तेथे पाळणाघराची सुविधा देणे नियोक्त्याला आवश्यक राहील.

सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये कामाचा ताण वाढतो. अशा वेळी अतिरिक्त वेळ काम करणाऱ्या कामगारांना दुप्पट बोनस देणे अनिवार्य केले जाणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी 29 कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी 4 व्यापक कामगार संहिता तयार केल्या आहेत. मात्र या संहितांचा अवलंब राज्यांना थेट करता येत नाही. त्यामुळे राज्य सरकार काही आवश्यक सुधारणा करून ही नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. या बदलांमुळे कामगारांना अधिक हक्क, सुरक्षितता आणि काम-जीवन समतोल साधण्याची संधी मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT