Cooperative societies Election  sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीचा बार उडणार, सरकारकडून स्थगितीच्या आदेशात बदल

Cooperative Societies Elections : सरकारच्या आदेशामुळे मजूर, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, विणकर, स्वयंरोजगार आदी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग यामुळे खुला झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना लावलेली स्थगिती कायम असतानाच, राज्य सरकारने काही संस्थांना त्यातून वगळत निवडणुकीचा मार्ग मोकळा केला आहे. विकास सोसायट्या वगळून क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

त्यामुळे अनेक महिन्यांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या सहकारी संस्थांमध्ये आता हालचाली वाढणार असून, स्थानिक पातळीवरील सत्तेची गणितेही नव्याने जुळवली जाण्याची शक्यता आहे.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत, त्याच टप्प्यावर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आदेशात अंशतः सुधारणा करत सरकारने काही संस्थांना निवडणूक प्रक्रिया राबविण्याची मुभा दिली आहे. यामध्ये विकास सोसायट्या वगळून क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांचा समावेश आहे.

मजूर, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, विणकर, स्वयंरोजगार आदी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग यामुळे खुला झाला आहे.

पदाधिकारी निवडींचाही मार्ग खुला

सरकारच्या नव्या आदेशामुळे केवळ निवडणुकाच नव्हे, तर संस्थांमधील पदाधिकारी निवडी आणि रिक्त संचालकपदांचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. चेअरमन, व्हाइस चेअरमन किंवा अन्य पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, मृत्यू अथवा अपात्रतेमुळे पद रिक्त झाल्यास त्या जागी नवीन पदाधिकारी निवडता येणार आहे. संचालक मंडळातील रिक्त जागाही संबंधित तरतुदींनुसार भरता येणार असल्याने अनेक संस्थांमधील रखडलेली पदाधिकारी निवड प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

निवडणुकांच्या हालचालींना वेग

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ७३ क अन्वये निवडणुका पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या आदेशात अंशतः सुधारणा करण्याची विनंती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी शासनाकडे केली होती. त्यानंतर सहकार विभागाने बुधवारी नवे आदेश जारी केले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे निवडणूक स्थगितीच्या काळात शांत असलेल्या सहकार क्षेत्रात पुन्हा राजकीय हालचाली सुरू होणार आहेत. अनेक संस्थांमध्ये संचालक मंडळ, पदाधिकारी आणि स्थानिक गटांचे समीकरण बदलण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे सहकारातील निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुकांसाठी सरकारचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT