Mumbai News : माजी मंत्री आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्यासाठी आधी बेमुदत उपोषण केलं, नंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. आता पुन्हा एकदा आक्रमक होत कडूंनी नागपूरमध्ये चक्का जाम आंदोलन करत मोठा लढा उभारला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारसोबत झालेल्या त्यांच्या कर्जमाफी संदर्भातील बैठकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी अपडेट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि शेतकरी नेत्यांसोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी (ता.30) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, आम्ही जी उच्चस्तरीय कमिटी स्थापन केली आहे, ती समिती 1 पर्यंत एप्रिल आम्हाला अहवाल देईल. त्यानंतर 30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्यासोबतच्या बैठकीत दिलं आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची’ स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशीयांची नियुक्ती करण्यात आली आहे. परदेशींच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
फडणवीस म्हणाले, कर्जमाफीबाबतच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. आम्ही आंदोलनकर्त्या नेत्यांना समजावून सांगितलं. आता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले नाहीत तर शेतकरी रब्बीची पेरणी करु शकणार नाही. त्यासाठी आता शेतकऱ्यांना पैसे देणे महत्वाचे आहे. पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. साडेआठ हजार कोटी रिलीज झाले असून पुढच्या 15 ते 20 दिवसांत राज्यातील 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचणार असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. त्यासंदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती स्थापन केली होती. उपाययोजना कशा करायच्या याचा निर्णय केला होता. कर्जमाफी हा एक भाग आहे. शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत आहे. पण त्यांना बाहेर कसं काढता येईल याचा आम्ही विचार करत असल्याचंही सीएम फडणवीस म्हणाले.
ही नऊ सदस्यीय समिती भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे येतील त्यासंदर्भात अभ्यास करणार आहे. तसेच या समितीनं एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपलं कामकाज पूर्ण करावं. कर्जमाफीसाठी काय निकष असावेत यासंदर्भातील अहवाल आम्हांला सादर करावा. या अहवालावर कर्जमाफीसंदर्भातील अंतिम निर्णय आम्ही 30 जून 2026 घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.