

Mumbai News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा व्होटचोरी आणि मतदारयाद्यांमधील घोळांवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आऱोप-प्रत्यारोपांचं राजकारण पेटलं आहे. विरोधकांकडून निवडणूक आयोग आणि सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) आगामी निवडणुकांमध्ये मनसैनिकांना अलर्ट राहण्याचा सल्ला देतानाच सरकारवरही किल्ल्यांवरील 'नमो टुरिझम सेंटर्सवरुन हल्ला चढवला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात गुरुवारी(ता.30 )मनसेचा पदाधिकारी मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे. पण आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जातंय. मी आत्ताच सांगतो खाली,वर आडवं,उभं कसंही केलं की फोडून टाकणार असा इशारा ठाकरेंनी यावेळी दिला.
राज ठाकरे म्हणाले, आजच्या वृत्तपत्रात आलेली बातमी पाहा, किती स्वाभिमान गहाण टाकायचा ह्याला काही मर्यादाच नाहीत. हे शिंदेचं खातं. ह्याचा जीआर देखील काढलाय, हे जर ऐकाल तर तुमची तळपायाची आग मस्तकाला जाईल.मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर पर्यटनाची 'नमो टुरिझम' सेंटर काढत आहे.
मात्र, आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जातंय. मी आत्ताच सांगतो, उभं केलं की फोडून टाकणार. मला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, खाली किती चाटुगिरी चालू आहे, हे पंतप्रधानांनाही माहिती नसेल, असे म्हणत राज ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंवरच (Eknath Shinde) टीकेची तोफ डागली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे.महाविकास आघाडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी महाराष्ट्रातील व्होटचोरी आणि मतदारयाद्यांमधील घोळ पुढे आणत राजकारण तापवलं आहे.
राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी मेळाव्यातून मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिले. तसेच राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. यावेळी ठाकरेंनी 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी सांगताच एकच हशा पिकला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पक्षाच्या मेळाव्यातून 1 तारखेच्या मोर्चाला मी स्वत: लोकलने येणार असल्याचेही सांगितले. आगामी निवडणुकीत तुम्ही लक्ष नाही दिलं तर हातात केळं येणार, गेली अनेक वर्ष मी हे सांगतोय. लोकं आपल्याला सांगतात राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण त्याचं मतात रुपांतर होतं नाही. पण, या सर्व भानगडीमुळे आपला पराभव होतो. अख्खा देश बोंबलतोय, याच पद्धतीने सत्तेत यायचं आणि हवं तसं वागायचं असा घणाघातही राज ठाकरे यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.