लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी उघडकीस आले आहेत.
छगन भुजबळ यांनी पडताळणी निवडणुकीमुळे झाली नाही, असे सांगितले.
भास्कर जाधव यांनी सरकारवर 50% महिलांना वगळण्याचा हेतू असल्याचा गंभीर आरोप केला.
Pune News : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने आता कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. सरकारी कर्मचारी महिला आणि ज्या पुरूषांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे अनेकांचे धाबे दणादणले असतानाच राज्यभर 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी सरकारला चुना लावल्याचे समोर आले आहे. ही माहिती ई- केवायसी पद्धतीने पडताळणीनंतर उघड झाल्याने आता पुन्हा पडताळणी मोहिम हाती घेतली जाणार आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असताना यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणुका तोंडावर असल्यानेच पडताळणी झाली नाही, असे म्हटलं आहे. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी जोरदार टोला लगावला आहे. तसेच या सरकारचा 50 टक्के महिला या योजनेतून कमी करण्याचा हेतू असल्याचा दावा केला आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत 2 कोटी 63 लाख महिलांची नोंद झाली होती. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. त्यांनी तिन महिन्यांचे पैसे गेले असतानाच विधानसभा निवडणूक लागली आणि पुन्हा महायुती सत्तेत आली. यानंतर आतापर्यंत तब्बल 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.
तर राज्यातील कोणत्या मंत्रीच्या जिल्ह्यात किती बोगस लाडक्या बहिणी आहेत याचाही आकडा समोर आला आहे. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 4 हजार, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यात 1 लाख 86 हजार 800 बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या आहेत. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1 लाख, 25 हजार 300 बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे दरमहा दीड हजारे घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
यावरून महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा खुलासा करताना, निवडणूक तोंडावर होती म्हणून पडताळणी झाली नाही अशी कबूली दिली आहे. तसेचस त्यांनी, ज्या अपात्र महिला आहेत ज्या अद्याप या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांनी स्वेच्छेने नावे मागे घ्यावीत. सरकारने त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये. पण जे पुरुष या योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
त्यांच्या भूमिकेमुळे आता राज्यात राजकीय वादळ आले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाधव यांनी, राज्यातील महिलांसाठी आधी ही योजना आणली, आता हे सत्तेवर बसले. पण आता दिवसागणित हे लोक लाडक्या बहिणींना निकषांत बसून कमी करत आहेत.
याआधी या सरकारने घोषणी केली की ज्यांची नोंदणी झाली. त्या सर्वांना निधी दिला जाईल. पण आता ई- केवायसी आणि चौकशीच्या नावाखाली राज्यभर 26 लाख 34 हजार बहिणींनी अपात्र ठरवण्याचे काम हे सरकार करत आहे. सरकारचा प्लॅन हा या योजनेतील 50 टक्के महिलांना अपात्र ठरवण्याचा असल्याचा दावा यावेळी भास्कर जाधव यांनी केला आहे.
प्रश्न 1: लाडकी बहीण योजनेत किती बोगस लाभार्थी सापडले?
उत्तर: तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी समोर आले.
प्रश्न 2: छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: निवडणुका असल्यामुळे पडताळणी वेळेवर झाली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रश्न 3: भास्कर जाधव यांनी काय आरोप केला?
उत्तर: सरकार 50 टक्के महिलांना या योजनेतून कमी करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.