Maharashtra health department news : राज्यातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आधुनिक औषध गुणवत्ता तपासणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून औषधांच्या नमुन्यांची अवघ्या दीड ते दोन मिनिटांत प्राथमिक तपासणी करता येणार आहे.
यासाठी प्रत्येकी 1 कोटी 20 लाख रुपये किमतीची आठ यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच आणखी 1900 डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.
औषधांमध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा गुणवत्तेबाबत संशय आढळल्यास संबंधित औषध कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. सरकारी रुग्णालयांमध्ये (Government) रुग्णांना दर्जेदार औषधे उपलब्ध व्हावीत, तसेच औषधांच्या गुणवत्तेतील अनियमितता रोखता यावी, हा या यंत्रणेचा उद्देश आहे.
औषधांचा (Drugs) दर्जा सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील आठ विभागांत आठ भरारी पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक पथकात दोन सदस्यांचा समावेश असेल. ही पथके संबंधित विभागातील सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांना दर महिन्याला अचानक भेटी देतील. या भेटीदरम्यान औषधांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाईल.
औषधांच्या गुणवत्तेत अनियमितता आढळल्यास संबंधित औषध कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य संस्थांमध्ये पुरवठा होणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
औषधांच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारची यंत्रणा देशात प्रथमच राबविण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. या यंत्रांच्या मदतीने औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी कमी वेळेत करता येणार असल्याने संशयास्पद औषधांची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी डॉक्टरांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 1400 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये सुमारे 600 विशेषज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. आता पुढील टप्प्यात आणखी 1900 डॉक्टरांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डॉक्टरांची भरती या दोन्ही निर्णयांमुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.