Illegal Liquor Mafia Sarkarnama
महाराष्ट्र

Illegal Liquor Mafia : पुणे विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभर धडक कारवाई; 8 दिवसांत 3,312 गुन्हे, तर 2,757 जणांना अटक

Massive crackdown illegal liquor trade across Maharashtra after Pune hooch tragedy; over 3,300 cases registered and 2,700+ arrests made just eight days : राज्या उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारूकांडनंतर राज्यभर कारवाई धडाका लावून 9.11 कोटींचे 74 हजार लिटर गावठी दारू जप्त अन् 12.25 लाख लिटर रसायन नष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra illegal liquor crackdown : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागा झाला असून अवैध दारू माफियांविरोधात राज्यव्यापी धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अवघ्या आठ दिवसांत राज्यभर तब्बल 3 हजार 312 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 हजार 757 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान 9 कोटी 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 74 हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.

28 मे ते 4 जून या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवैध दारू निर्मिती केंद्रे, साठेबाजी, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळ्यांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत 107 वाहने जप्त करण्यात आली. तसेच अवैध दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे तब्बल 12 लाख 25 हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. पुण्यातील (Pune) दुर्घटनेनंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे जाळे उघडकीस आल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

राज्यातील (Maharashtra) विविध विभागांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत गावठी दारू जप्तीच्या बाबतीत पुणे विभाग पहिल्या क्रमांकावर राहिला. पुणे विभागातून 18 हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. त्यापाठोपाठ कोकण विभागातून 17 हजार लिटर, तर नागपूर विभागातून 6 हजार लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेनंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू सापडणे हे राज्यातील अवैध दारू व्यवसाय किती खोलवर रुजला आहे, याचे गंभीर संकेत मानले जात आहेत.

दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संख्येत कोकण विभाग राज्यात आघाडीवर राहिला. कोकण विभागात 587 गुन्ह्यांची नोंद झाली असून नागपूर विभागात 488 आणि पुणे विभागात 437 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवळ या तीन विभागांतच दीड हजारांहून अधिक गुन्हे उघडकीस आल्याने अवैध दारू माफियांचे राज्यभर पसरलेले जाळे पुन्हा एकदा समोर आले आहे.

'अवैध दारू माफियांना सोडणार नाही'

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अमलबजावणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांनी सांगितले की, पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्यभर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की, अवैध दारूविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने उत्पादन शुल्क विभागाला कळवावी. नागरिकांचा सहभाग आणि सतर्कता यामुळेच या बेकायदेशीर साखळीवर प्रभावीपणे आळा घालता येईल.

पुणे दुर्घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

पुण्यातील विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना आता उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर मोठी मोहीम उघडली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू, रसायनसाठे आणि गुन्हे उघडकीस येत असल्याने अवैध दारू व्यवसायाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT