Election Commission EVM Sarkarnama
महाराष्ट्र

Local Body Election update : 'EVM'बाबत मोठी अपडेट; मतदाराने मतदानाची प्रक्रिया पूर्ण न केल्यास अधिकारीच ‘नोटा’चे बटन दाबणार...

Maharashtra local body elections : एखाद्या मतदारास बॅलेटिंग युनिटवर लावलेल्या मतपत्रिकेवरील उमेदवारांना मतदान करण्याची इच्छा नसल्यास तो वरीलपैकी एकही नाही (नोटा) या पर्यायासमोरील बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो.

Rajanand More

NOTA rule Maharashtra : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मतदानासाठी आता जेमतेम चार दिवस उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. या घडामोडी घडत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मतदानावेळी मशिनवरील END बटन बंद केले जाणार आहे. यामागचे कारणही आयोगाने सांगितले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश काढले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (मुंबई वगळून) निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराला दोन ते पाच मते देण्याचा अधिकार आहे. या तरतुदींचा विचार करून आयोगाने या निवडणुकांसाठी विकसित केलेल्या मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर शेवटचे (१६ वे) END बटन ठेवले आहे.

END बटनाचा वापर करून निवडणुका घेताना स्थानिक पातळीवर विविध अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. या अडचणी विचारात घेऊन END बटन पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद करणे आवश्यक झाल्याचे आयोगाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

आदेशानुसार ता. २९ डिसेंबर २०२२ चे मतदान यंत्रावरील END बटनाच्या वापराबाबतचे आदेश या आदेशाद्वारे रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या ता. १२ नोव्हेंबर २०१३ च्या आदेशातील तरतुदींनुसार सर्व स्थानिक निवडणुकांसाठी END बटन पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद केले जाईल. मुंबई वगळता सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये मतदाराला दोन ते पाच मते देण्याचा अधिकार आहे.

एखाद्या मतदारास बॅलेटिंग युनिटवर लावलेल्या मतपत्रिकेवरील उमेदवारांना मतदान करण्याची इच्छा नसल्यास तो वरीलपैकी एकही नाही (नोटा) या पर्यायासमोरील बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो. मात्र काही मतदार मतदान कक्षात आल्यानंतर आपले मतदान पूर्ण करणार नाहीत अथवा कोणत्याही उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा नसली तरी नोटासमोरील बटन दाबण्यासही नकार देतील, त्याठिकाणी मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी सज्ज करण्याच्यादृष्टीने पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

कोणताही मतदार आपले मतदान पूर्ण न करता मतदान कक्षातून बाहेर निघाला तर मतदान अधिकारी यांना कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे व बिप साऊंड न वाजल्यामुळे मतदाराने, मतदान पूर्ण केले नाही, हे गोष्ट लक्षात येईल. अशा परिस्थितीत मतदान केंद्राध्यक्षांनी संबंधित मतदाराला त्याचे मतदान पूर्ण न झाल्याबाबतची कल्पना देऊन पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन अथवा वरीलपैकी एकही नाही या पर्यायासमोरील बटन दाबून मतदान पूर्ण करण्याबाबत विनंती करावी, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.

त्यानंतरही मतदाराने मतदान करण्यास किंवा नोटाचे बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्राध्यक्षांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांच्या नावासमोरील दिवे एखादा पुठ्ठा अथवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील नोटा  पर्यायासमोरील बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या कार्यपध्दतीचा अवलंब करताना मतदान केंद्राध्यक्षाने मतदाराने केलेल्या मतदानाची माहिती कोणालाही होणार नाही, याची पुरेशी खबरदारी घ्यावी. जर एखाद्या मतदाराने मतदान कक्षात जाण्यापूर्वीच मतदानास नकार दिला तर अशा मतदाराच्या मतदान नोंदवहीतील नोंदसमोर अभिप्राय या रकान्यात मतदानास नकार दिल्याची नोंद घ्यावी. याठिकाणी नोंदविलेल्या मतांच्या हिशेबामध्ये अनुक्रमांक ३ येथे अशा मतदारांची संख्या नमूद करण्यात येईल, असे आयोगाने आदेशात नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT