mahayuti and mva  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MLC election : विधानपरिषद निवडणुकीत 5 जण बिनविरोध, 12 मतदारसंघात दुरंगी अन् तिरंगी लढती : महायुतीतील बंडखोरांनी वाढवली धाकधूक

MLC election News : गुरुवारी शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या 5 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उर्वरित 12 ठिकाणी येत्या काळात चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्यातच काही ठिकाणी उमेदवारी अर्ज परत घेण्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. गुरुवारी शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या 5 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उर्वरित 12 ठिकाणी येत्या काळात चुरशीची लढत होणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

राज्यातील ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधूदुर्ग, यवतमाळ, वर्धा, पुणे या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यामध्ये महायुतीमधील पक्षनिहाय पहिले तर भाजपचा दोघे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवार (NCP) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोघे जण बिनविरोध विजयी झाले. विधान परिषदेच्या या दहा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या माघारीनंतर गेमच पालटला असून यापैकी 5 ठिकाणी महायुतीने गुलाल उधळला आहे.

ठाणे मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. तर यवतमाळमधून शिंदे यांच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध झाले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून भाजपचे अरूण लखानी बिनविरोध, पुण्यातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे, तर रायगडमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे बिनविरोध विजयी झाले.

दुसरीकडे उर्वरित 12 मतदारसंघात निवडणूक होत असून कुठे, कोण निवडणूक लढत आहेत?

विदर्भातील नागपूर मतदारसंघात भाजपचे राजीव पोतदार विरुद्ध काँग्रेसचे अतुल लोंढे अशी लढत होत आहे. अमरावतीमध्ये भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील विरुद्ध काँग्रेसचे हर्षजित देशमुख असा सामना रंगणार आहे. भंडारा-गोंदियात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नरेश ईश्वरकर अशी लढत होत आहे.

मराठवाड्यातील नांदेडमध्ये भाजपचे अमरनाथ राजूरकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर कृष्णा आष्टीकर अशी लढत होत आहे. तर परभणी-हिंगोलीमध्ये शिंदे शिवसेनेचे सईद खान विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. विवेक नावंदर यांच्यात सामना रंगणार आहे. उस्मनाबाद-लातूर- बीडमध्ये भाजपचे बसवराज पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे महेश देशमुख अशी लढत होत आहे. औरंगाबाद-जालना मतदारसंघातून भाजपचे सुहास शिरसाट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बंडखोर गणेश लोखंडे अशी लढत होत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये शिंदे शिवसेनेचे नरेंद्र दराडे विरुद्ध भाजपचे बंडखोर गोकुळ गिते निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांच्या समोर ठाकरे यांच्या शिवसेनेचे शरद तायडे व शिंदे शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे अशी तिरंगी लढत होत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारामध्ये भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप अशी लढत हॊणार आहे. तर सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार वसंतराव देशमुख रिंगणात उतरले आहेत. तर अहिल्यानगरमधून भाजपचे प्राजक्त तनपुरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर दत्तात्रय पानसरे अशी लढत होणार आहे. या सर्व लढतीमुळे उत्सुकता शिगेला पोंहचली असून सर्वांचे लक्ष 18 जूनला होत असलेल्या निवडणुकीकडे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT