Ncp shivsena Congrss Bjp sarkarnama
महाराष्ट्र

MLC election : विधान परिषद निवडणूक: पाचही मतदारसंघात बंडखोरांची हवा; महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी

Pune Graduate Constituency News : पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानपरिषदेच्या पाच जागा 6 डिसेंबरला रिक्त होणार आहेत. त्यासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. त्यामध्ये पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ तर पुणे व अमरावती शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. या पाच जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षात वेगवान घडामोडी घडत आहेत त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता या पाच जागेसाठी महायुती, महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. या पाचही मतदारसंघात सध्या बंडखोरांची हवा आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ :

पुणे पदवीधर मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला सुटणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तयारी करीत असलेले भैय्या माने यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे फायनल झाले आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी होणार आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघ :

पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेले एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटे व मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप निवडणूक लढवण्याची गेल्या एकही दिवसापासून तयारी करीत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चिवटे, सामंत यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ :

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी भाजप इच्छुक आहे. संजय केनेकर यांनी ताकद लावली आहे. मुंबईत ते पाच दिवस तळ ठोकून होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबाद पदवीधरच्या जागेवर भाजप उमेदवार देणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे केनेकर काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ :

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसकडून आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दत्तात्रय लहाने बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे लक्ष लागले आहे. तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने माजी आमदार श्रीकांत शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये बंडखोरी अटळ मानली जात आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघ :

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार सुधाकर कोहळे आणि माजी आमदार अनिल सोले यांच्या नावाची चर्चा आहे. पण अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे तिकीट कापलेले इच्छुक काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT