Maharashtra MSRTC sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra MSRTC : एसटीच्या 1485 हेक्टर जमिनींचे खासगीकरण? परिवहन विभागाचा मोठा प्रस्ताव चर्चेत; फडणवीस घेणार अंतिम निर्णय

Maharashtra Government Plans PPP Development Hectares of MSRTC Depot : राज्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून बस डेपो आणि आगारांच्या मौल्यवान जागा 'पीपीपी' तत्त्वावर विकसित करण्याचा घाट घातला जात आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : राज्यातील शहरी भागापासून अतिदुर्गम भागापर्यंत धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाबाबत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून सरकार विकासाच्या नावाखाली एसटी महामंडळाच्या मालकीच्या मोक्याच्या तब्बल 1485 हेक्टर जागांचे खासगीकरण करणार आहे. या जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी म्हणजेच 'पीपीपी' (PPP) तत्त्वावर विकसित केल्या जाणार आहेत. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेणार आहेत.

ABP माझाच्या ऑनलाईन माध्यमावर आलेल्या वृत्तानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच एसटीच्या जागांचा व्यावसायिक विकास करण्याचे संकेत दिले होते. महामंडळाकडे राज्यभरातील अनेक शहरांमध्ये बसस्थानके, बस आगारे आणि मोक्याच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी तब्बल 1485 हेक्टर मोक्याच्या जागांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.

या मौल्यवान जागा सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी हा संपूर्ण आराखडा तयार करणार आहेत. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री फडणवीस घेतील, असेही आता समोर येत आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असून या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याचा सरकारचा विचार असल्याचे सांगितले होते. यासाठी 'पीपीपी' तत्त्वावर महामंडळाच्या 72 जागांच्या विकास आराखड्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांतील जागांची अ (A), ब (B) आणि क (C) अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तसेच या जागांबाबत एकत्रित पॅकेज तयार करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रस्तावावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याच्या नावाखाली मोक्याच्या जागा खासगी बिल्डरांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोपदेखील होऊ शकतो. मात्र, अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नसून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT