Shiv Sena split: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच पक्षाचे सहा खासदार शिवसेनेत गेल्यानंतर आता आणखी १४ हून अधिक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
गुलाबराव पाटील यांनी 'ऑपरेशन टायगर ३.०' अद्याप सुरू असल्याचे सांगत, ठाकरे गटातील अनेक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला. “एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवतात आणि ऑपरेशन टायगर यशस्वी होते,” असे सूचक विधान करत त्यांनी ठाकरे गटात आणखी मोठी फूट पडण्याचे संकेत दिले.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी नुकतीच बंडखोरी करीत शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यातच आता आमदार फुटीची चर्चा रंगू लागल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील २० आमदारांपैकी १४ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षांतर करू शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीत अनेक आमदार गैरहजर राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी पाटलांचा दावा खोडून काढला आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी “ऑपरेशन टायगर” सुरू नसल्याचे स्पष्ट केले. तरीदेखील महाविकास आघाडीतील काही आमदार स्वखुशीने शिंदे गटात येण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. आज ते यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. योगायोग म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच ते एकाच विमानाने नागपुरात पोहोचले. विदर्भातील ठाकरे गटाचे आमदार आगामी सभांना उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या ठाकरे गटाकडे २० आमदार असून, पक्षात अधिकृत फूट पडण्यासाठी आवश्यक असलेला दोन-तृतीयांश आकडा १४ इतका आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.