BJP has nominated senior leader Ramrao Wadkute for the Rajya Sabha Sarkarnama
महाराष्ट्र

Rajysabha Election : महादेव जानकरांना टक्कर देणारा चेहरा राज्यसभेवर : धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटण्याआधीच भाजपाचा 'मास्टर स्ट्रोक'

Rajysabha Election : जालन्यात मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाचा 'एसटी' आरक्षणासाठीचा लढा तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन धनगर समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

Jagdish Pansare

Rajyasabha Election : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत मराठवाड्यासह राज्यात नव्या वादाला तोंड फुटले होते. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष यातून निर्माण झाला. यावर राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनूसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसींचे आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा केला. यावर अद्याप वाद सुरू असतानाच मराठवाड्याच्या जालन्यातूनच धनगर आरक्षणासाठीचा लढा सुरू झाला. धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे.

या लढ्याला तीव्र स्वरूप प्राप्त होण्याआधीच या समाजाला थेट राज्यसभेवर प्रतिनिधित्व देण्याची खेळी करत भाजपाने मास्टर स्ट्रोक लगावल्याचे बोलले जात आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याला या निमित्ताने भाजपाने राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिले आहे. माजी आमदार रामराव वडकुते या धनगर समाजातील मोठ्या चेहऱ्याला राज्यसभेवर संधी देत भाजपाने सामाजिक समीकरण साधले आहे. शिवाय यातून भाजपपासून दुरावलेल्या महादेव जानकर यांनाही टक्कर देणारा नेता पुढे आणल्याचे बोलले जाते.

रामराव वडकुते हे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. 2019 मध्ये त्यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर ते हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात कार्यरत राहिले. 2024 मध्येही कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला. तेव्हापासूनच ते पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते.

महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर समाजाचे नेते म्हणून ओळख असलेले रामराव वडकुते यांनी विधान परिषदेचे आमदार, अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत. धनगर प्रश्नांसाठी, पशुपालक, मेंढपाळ आणि शेतकरी घटकांचे प्रश्न मांडण्यात ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्याने मांडला.

धनगर आरक्षणाचा आवाज :

धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी वडकुतेंनी विधान परिषदेतसेच बाहेरही आंदोलने केली. अभ्यासपूर्ण निवेदने आणि बैठकांच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण केला. समाजाच्या प्रश्नांवर ते स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत असल्याने धनगर समाजात त्यांना मानाचे आणि नेतृत्वाचे स्थान मिळाले. मराठवाडा आणि विशेषतः हिंगोली परिसरात त्यांचा प्रभाव या मुद्द्यामुळे वाढला.

फडणवीसांनी ओळखले होते महत्व :

रामराव वडकुते यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर मराठवाड्यातील भाजप संघटनेत त्यांची ओळख एका विशिष्ट गटाशी जोडली जाऊ लागली. राजकीय वर्तुळात रामराव वडकुते हे प्रामुख्याने पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जातात. धनगर समाजातील नेतृत्व, मराठवाड्यातील प्रभाव आणि सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका या मुद्द्यांमुळे त्यांची राजकीय जुळवाजुळव पंकजा मुंडे यांच्या गटाशी असल्याचे बोलले जाते.

धनगर आरक्षणाचा मुद्दा हा दोघांच्याही राजकारणाचा केंद्रबिंदू राहिल्याने या समीकरणाला अधिक बळ मिळाले. मराठवाड्यातील भाजप संघटनेत काम करताना वडकुते यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यक्रम, बैठका आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ते पंकजा मुंडे समर्थक गटातील प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जातात.

त्यांचा भाजप प्रवेश हा प्रामुख्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाला होता. पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला आणि त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांचे स्वागत केले होते. राजकीय वर्तुळात असे मानले जाते की मराठवाड्यातील संघटनात्मक समन्वय आणि धनगर समाजातील प्रभाव लक्षात घेऊन हा प्रवेश घडवून आणण्यात आला.

वडकुते हे धनगर समाजातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना राज्यसभेत पाठविल्यामुळे भाजपकडून धनगर समाजाला थेट प्रतिनिधित्व दिल्याचा संदेश जाणार आहे. महाराष्ट्रात धनगर समाजाची मोठी वोट बँक आहे. त्यामुळे सामाजिक समीकरणे मजबूत करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. मराठवाड्यात भाजपची संघटना काही जिल्ह्यांत मजबूत असली तरी काही ठिकाणी अंतर्गत गटबाजी दिसून येते.

वडकुते यांना राष्ट्रीय पातळीवर संधी दिल्याने मराठवाड्यातील त्यांच्या समर्थकांना उभारी मिळू शकते. विशेषतः हिंगोली आणि आसपासच्या भागात पक्षाची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. याशिवाय सध्या भाजपपासून राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासारखा आक्रमक चेहरा दुरावला आहे. त्यामुळे धनगर समाज भाजपसोबत जोडून ठेवायचा असेल, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळू द्यायचा नसेल तर जानकर यांना टक्कर देऊ शकेल असाच चेहरा पुढे आणल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT