Prakash Ambedkar Sarkarnama
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: निवडणूक जाहीर होताच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली महासभा! मुंबई सोडणार दणाणून

VBA Samvidhan Samman Mahasabha : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची मोठी घोषणा; २५ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर महासभेचे आयोजन  

सरकारनामा ब्यूरो

VBA Samvidhan Samman Mahasabha : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचारयंत्रणांना गती देण्यास सुरुवात केली आहे. याच रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत संविधान सन्मान महासभेची घोषणा केली आहे. मुंबईसह राज्यातील स्थानिकच्या निवडणुकीबाबत आंबेडकरांकडून या महासभेत मोठा निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या २५ नोव्हेंबरला ऐतिहासिक शिवाजी पार्कवर ही महासभा होणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या सभेची घोषणा करताना 'भारत का संविधान, हमारा अभिमान' आणि 'हमारा देश संविधान से चलेगा, मनुवाद से नहीं' असा स्पष्ट संदेश दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी एक्स या सोशल माध्यमाद्वारे 'मनुवाद मुर्दाबाद! जय भीम. जय संविधान. जय भारत' या घोषणा देत सभेचा मुख्य अजेंडाच स्पष्ट केल्याचे दिसते आहे. संविधान सन्मान महासभेच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे हे मोठे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी याआधीही संविधान रक्षण, सामाजिक न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले आहेत. मुंबईतील शिवाजी पार्कचे ऐतिहासिक आणि प्रतीकात्मक महत्त्व लक्षात घेता ही सभा राज्यातील राजकीय वातावरण तापवणारी ठरणार आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी वंचितने कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. त्यांनी महायुती वगळता इतर पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी दरवाजे खुले ठेवले आहेत. मात्र, कोणत्याही पक्षाकडून त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत सोशल मीडियातून आपली भूमिका स्पष्ट केली होती.

नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका मंगळवारी जाहीर झाल्या आहेत. मात्र, अद्याप कुठे कुणाची आघाडी किंवा युती होणार, हे स्पष्ट नाही. बहुतेक पक्षांनी स्थानिक नेत्यांवर याचा निर्णय़ सोपवला आहे. त्यामध्ये वंचित काय भूमिका घेणार, याबाबतही उत्सुकता आहे. मुंबईतील महासभेमध्ये त्याबाबत आंबेडकरांकडून भाष्य केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT