Teachers Union Meeting Pune: राज्यातील प्राथमिक शिक्षकांचा ऑनलाइन कामांच्या वाढत्या व्यापाविरोधातील असंतोष आता तीव्र होण्याची शक्यता आहे. अध्यापन सोडून विविध प्रशासकीय कामे, ऑनलाइन उपक्रम आणि अहोरात्र येणाऱ्या WhatsApp संदेशांमुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी आता थेट असहकाराचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
1 डिसेंबर 2026 पासून अध्यापनावर परिणाम करणारी ऑनलाइन कामे न करण्यासह प्रशासनिक WhatsApp ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्धार राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी केला आहे.
यासंदर्भात मंगळवारी (24 नोव्हेंबर) पुण्यातील शिक्षक भवन येथे राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्यासह टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची भूमिका निश्चित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी याबाबत माहिती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्यापेक्षा प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांमध्येच शिक्षकांचा अधिक वेळ जात असल्याची तक्रार संघटनांनी केली आहे. वेगवेगळ्या उपक्रमांची जबाबदारी, ऑनलाइन माहिती भरणे, वरिष्ठांकडून येणारे आदेश आणि प्रशासनिक WhatsApp ग्रुपवरील सततचे संदेश यामुळे शिक्षक मानसिकदृष्ट्याही त्रस्त झाले आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना द्यायला हवा तितका अध्यापनाचा वेळ मिळत नसल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.
सरकारने अशैक्षणिक कामे न देण्याबाबत निर्णय घेतलेला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची कामे शिक्षकांवर सोपवली जात आहेत. शाळांमधील स्वयंसेवी संस्थांचा (NGO) वाढता हस्तक्षेपही अडचणी वाढवत असल्याचे संघटनांनी नमूद केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असले, तरी कामांच्या अतिरिक्त ओझ्यामुळे अध्यापनावर मर्यादा येत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
ऑनलाइन कामांबरोबरच संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, TET संदर्भातील शासनाची नकारात्मक भूमिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबाबतचे धोरण आणि शिक्षकांच्या मूलभूत समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. वारंवार आंदोलने आणि शासनस्तरावर चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने सर्व संघटनांनी एकत्रितपणे लढा देण्याचे ठरवले.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघाच्या विविध गटांसह शिक्षक भारती, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना आणि दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटनेसह विविध संघटनांचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पुढील काळात सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, पालक संघटना आणि लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचे निश्चित करण्यात आले. शिक्षकांच्या चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.
'शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या' या भूमिकेला प्राधान्य देत शिक्षक संघटनांनी आता ऑनलाइन कामांच्या अतिरेकाविरोधात एकत्रित भूमिका घेतली आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून शिक्षकांच्या असहकाराच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि शासन त्यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.