TET Exam 2027: टीईटी परीक्षेची प्रतीक्षा संपणार? जानेवारी-फेब्रुवारीत परीक्षा घेण्याचे नियोजन; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra TET Exam 2027: महाराष्ट्रात टीईटी परीक्षा २०२७ जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन सुरू असून शासनाच्या अधिकृत मंजुरीची प्रतीक्षा आहे.
TET  exam
TET examsarkarnama
Published on: 
Updated on: 

TET Exam Latest Update: शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शिक्षकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रद्द झालेली टीईटी परीक्षा पुन्हा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२७ मध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याने परीक्षेच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरातील शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही या परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील सुमारे दोन लाखांहून अधिक उमेदवारांनी जून २०२६ मध्ये होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मात्र, परीक्षा होण्याच्या आदल्या दिवशीच पेपर फुटल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

TET  exam
ZP Teachers: ZP विषय शिक्षकांना मोठा दिलासा! पदवीधर वेतनश्रेणीचा पूर्ण लाभ मिळणार; कोर्टाचा राज्य सरकारला झटका

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २८ जून रोजी ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, पेपरफुटीच्या प्रकारामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनातही उमटले. त्यावेळी सरकारकडून भविष्यात टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या घटनेला जवळपास सहा महिने होत आले तरी परीक्षेचे पुढील वेळापत्रक जाहीर झालेले नाही. परिणामी, नोंदणी केलेले उमेदवार परीक्षेच्या घोषणेची वाट पाहत आहेत.

TET  exam
Singh Sisters Palace: 7 मुली, 7 सरकारी नोकऱ्या! वडिलांच्या संघर्षाला लेकींची 4 मजली इमारतीची अनोखी भेट

परीक्षा परिषदेकडून परीक्षा आयोजित करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. यासंदर्भात नुकतेच पुन्हा एकदा पत्र पाठवून परीक्षा घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया निश्चित होणार आहे.

ऑनलाइन परीक्षेतील भाषेचा पेच कायम

टीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, परीक्षा विविध भाषांमध्ये आयोजित करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत.

या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पर्यायांचा विचार करून लवकरात लवकर परीक्षा घेण्याची तयारी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. आता राज्य शासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो आणि परीक्षेला नेमकी कधी परवानगी मिळते, याकडे राज्यातील शिक्षक आणि टीईटी उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.