MSRTC fuel saving campaign across Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

MSRTC Fuel Saving : एसटीचा ‘डिझेल सेव्हिंग प्लॅन’ ऑन! चालकांना मिळणार विशेष भत्ता, इंधन बचतीसाठी राज्यभर मोहीम, प्रताप सरनाईकांचा निर्णय

Maharashtra ST diesel saving plan launched: राज्य परिवहन महामंडळ एसटी बसवर दररोज 10.87 लाख लिटर डिझेल खर्चावर नियंत्रणासाठी प्रताप सरनाईक यांची आक्रमक भूमिका घेत, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार आणि आगारांमध्ये लागणार बचतीची स्पर्धा लागावी यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

Pradeep Pendhare

MSRTC drivers to get incentive for fuel saving: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता राज्यभर ‘इंधन बचत मोहीम’ प्रभावीपणे राबवली जाणार आहे.

प्रत्येक आगाराला डिझेल बचतीची ठोस उद्दिष्टे दिली जाणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना विशेष भत्ता आणि पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी इंधन बचतीवर भर देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, एसटीला दररोज तब्बल 10.87 लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे इंधन खर्चावर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.

त्यांनी सांगितले की, राज्यातील (Maharashtra) प्रत्येक आगाराने दररोज किमान पाच लिटर डिझेलची बचत केली तरी संपूर्ण राज्यातून रोज जवळपास एक हजार लिटर डिझेल वाचू शकते. सध्याच्या दरानुसार ही बचत दररोज सुमारे एक लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. छोट्या बचतीतून मोठी आर्थिक शिस्त निर्माण होते आणि भविष्यात हीच बचत एसटीची ताकद ठरेल, असे सरनाईक यांनी नमूद केले.

डिझेल बचतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून त्यांना अतिरिक्त भत्ताही दिला जाणार आहे.एसटीचा चालक हा केवळ वाहन चालवणारा कर्मचारी नसून संस्थेच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक आहे. जबाबदारीने वाहन चालवणारा चालक एसटीचे लाखो रुपये वाचवू शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, निश्चित उद्दिष्टांपेक्षा अधिक इंधन बचत करणाऱ्या आगारांना दरमहा विशेष पुरस्कार आणि आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामुळे आगारांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन बचतीची चळवळ अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एसटीच्या बसचे ‘केपीएल’ अर्थात किलोमीटर प्रति लिटर प्रमाण कमी येत असल्यास संबंधित चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, अनावश्यक इंजिन सुरू ठेवणे टाळणे आणि योग्य ब्रेकिंग पद्धती यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

तसेच बसची दैनंदिन तपासणी, इंजिन कार्यक्षमता, दुरुस्ती यावरही अधिक भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टायर प्रेशर कमी असणे, ऑइल गळती आणि ब्रेक प्रणालीतील त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणावर इंधनाचा अपव्यय होत असल्याने कार्यशाळा स्तरावर अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

डिझेलचा प्रत्येक थेंब म्हणजे राष्ट्रीय संपत्ती

एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर महसूलवाढीसोबत इंधन बचतीची व्यापक चळवळ उभी करावी लागेल. डिझेलचा प्रत्येक थेंब वाचवणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी ठामपणे म्हटले. अधिकारी, कर्मचारी आणि चालकांनी जबाबदारीने काम केल्यास भविष्यात हीच बचत एसटी महामंडळासाठी मोठी आर्थिक ताकद ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT