ST Bus NCMC Card Deadline Extension : महाराष्ट्रातील एसटी बसने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप स्मार्ट कार्ड न काढलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय 1 जानेवारी 2027 पासून लागू होणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात विविध सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने मिळावा, यासाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डची नोंदणी आणि वितरण सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2026 पासून एसटीच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिला लाभार्थ्यांची अद्याप कार्ड नोंदणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रवासी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांनीही मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. या सर्व बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाकडून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 10 लाख NCMC स्मार्ट कार्डांची नोंदणी आणि वितरण करण्यात आले आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांपर्यंत कार्ड पोहोचवण्यासाठी आता ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि प्रवासी संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येईल.
NCMC कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2026 ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, या मुदतवाढीच्या काळात सर्व पात्र लाभार्थ्यांनी NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. त्यामुळे कार्ड काढण्यासाठी राहिलेल्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आता आणखी वेळ मिळणार आहे.