Maharashtra ST E-Bus sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra ST E-Bus: 'लालपरी' आता धूर सोडणार नाही! 2037 पर्यंत एसटी होणार ई-बस

MSRTC buses to become electric by 2037: सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी जवळपास १,१०० बसेस इलेक्ट्रिक आहेत. आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे पाच हजार डिझेल बस या शेवटच्या डिझेल बस ठरणार आहेत.

Mangesh Mahale

Maharashtra ST e-bus latest news : महाराष्ट्राची ‘लालपरी’ आता डिझेलच्या धुरातून बाहेर पडून इलेक्ट्रिकच्या दिशेने वेगाने वाटचाल करणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) २०३७ पर्यंत संपूर्ण बस ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ३१२व्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

सध्या एसटीच्या ताफ्यात सुमारे १४ हजार बसेस असून, त्यापैकी जवळपास १,१०० बसेस इलेक्ट्रिक आहेत. आगामी काळात ताफ्यात दाखल होणाऱ्या सुमारे पाच हजार डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल बसेस ठरणार आहेत. त्यानंतर नव्या बसेसची खरेदी प्रामुख्याने ई-बसेसच्या स्वरूपात करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पारंपरिक लालपरीसोबत भविष्यात ‘ई-लालपरी’चा ताफा वाढताना दिसणार आहे.

या बदलासाठी जुन्या बसेसचाही वापर केला जाणार आहे. सुमारे सात ते आठ वर्षे सेवा बजावलेल्या काही डिझेल बसेसचे २०२७ पासून टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचवेळी प्रवाशांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन नव्या ई-बसेस ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन आहे.

एसटीच्या जुन्या बसेसच्या विल्हेवाटीची प्रक्रियाही या आराखड्याचा भाग आहे. नियमांनुसार ताफ्यातील सुमारे पाच हजार जुन्या डिझेल बसेस टप्प्याटप्प्याने स्क्रॅप केल्या जाणार आहेत. डिझेल बसचे अपेक्षित आयुर्मान सुमारे १५ वर्षे, तर इलेक्ट्रिक बसचे आयुर्मान सुमारे २० वर्षे असल्याने दीर्घकालीन वापराचा विचारही या संक्रमणामागे आहे.

ई-बस वाढवायच्या असतील तर चार्जिंगची सुविधाही तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे विविध आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन, वीजपुरवठा आणि आवश्यक विद्युत पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. ई-बसेसची संख्या वाढवताना चार्जिंग नेटवर्कही त्याच वेगाने विकसित करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.

एसटीच्या ताफ्याच्या आधुनिकीकरणासाठी पाच हजार नव्या ‘लालपरी’ बसेसची खरेदी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या बसेस दाखल झाल्यानंतर जुन्या बसेसवरील ताण कमी होऊन ग्रामीण भागातील सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे, इंधन खर्चात बचत करणे आणि सार्वजनिक वाहतूक अधिक पर्यावरणपूरक बनवणे हा या बदलाचा प्रमुख उद्देश आहे. २०३७ पर्यंतचा हा प्रवास पूर्ण झाल्यास महाराष्ट्राची पारंपरिक ‘लालपरी’ इलेक्ट्रिक रूपातील ‘ई-लालपरी’ म्हणून नवे रूप घेईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT