Maharashtra Teacher Awards 2026 Delay Sarkarnama
महाराष्ट्र

Teacher Award: राष्ट्रीय स्तरावर सन्मान, महाराष्ट्रात मात्र प्रतीक्षा! शिक्षक पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी लांबणीवर

Maharashtra Teacher Awards 2026 Delay : राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांचा गौरव झाला असताना, महाराष्ट्रात मात्र सलग दुसऱ्या वर्षी राज्य शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया रखडली आहे. प्रशासनाच्या 'लेटलतीफ' कारभारामुळे पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Mangesh Mahale

State Teacher Award Maharashtra: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकतेच शिक्षक दिनी प्रदान करण्यात आले. पण, महाराष्ट्रातील गुणवंत शिक्षकांसाठी दिला जाणारा 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार' या वर्षीही लांबणीवर पडला आहे. सलग दुसऱ्या वर्षी शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) राज्यातील शिक्षकांचा सन्मान न झाल्याने राज्य सरकारच्या 'लेटलतीफ' कारभारावर टीका होत आहे.

पुरस्कारांची पार्श्वभूमी व सद्यस्थिती

  • पारंपारिक स्वरूप: दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले जाते. महाराष्ट्रात १९६२-६३ पासून ही योजना सुरू आहे.

  • पुरस्कारांची विभागणी: यामध्ये ३८ प्राथमिक, ३९ माध्यमिक, २ विशेष शिक्षक, १९ आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका आणि प्रत्येकी १ दिव्यांग व स्काऊट-गाइड शिक्षक अशा विविध प्रवर्गांत हे पुरस्कार दिले जातात.

  • वर्तमान चित्र: राष्ट्रीय पातळीवर ५ सप्टेंबरला शिक्षकांचा गौरव झाला; मात्र महाराष्ट्रातील राज्य शिक्षक पुरस्कारांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली नसल्यामुळे राज्यातील शिक्षक सन्मानापासून वंचित राहिले आहेत.

शिक्षकांची नाराजी

तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकदिनीच शिक्षकांचा बहुमान न होणे ही अत्यंत शोकांतिका आहे, अशी खंत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केली आहे. शिक्षकदिनी मिळणाऱ्या पुरस्काराचे वेगळे महत्त्व असते, परंतु शासनाकडून अजूनही घोषणा झालेली नाही.

"एकीकडे राष्ट्रीय पुरस्कारांची तयारी पूर्ण झालेली असताना राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागणे हे दुर्देव आहे. याशिवाय २०१८ पासून आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची वेतनवाढ शासनाने बंद केली असून ती तात्काळ पूर्ववत करावी," अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे (प्राथमिक विभाग) प्रांत कार्यवाह पुरोषोत्तम काळे यांनी केली आहे.

शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण

या विलंबावर शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, राज्य शिक्षक पुरस्कारांची अंतिम प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत शासनस्तरावरून पुरस्कारप्राप्त शिक्षकांची अधिकृत घोषणा केली जाईल आणि लवकरच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT