Pune News, 31 Aug : राज्यातील शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पवित्र संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलाखतीविना निवड प्रक्रियेत तब्बल १३ हजार १११ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिफारस झालेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ६० टक्के महिला आहेत.
त्यामुळे शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ७ हजार ३०० हून अधिक महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होत असल्याने शिक्षक भरतीकडे उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले होते. आता भरती प्रक्रियेला गती मिळाल्याने रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गणित-विज्ञानाच्या शिक्षकांची मोठी गरज
इयत्ता नववी ते दहावीच्या स्तरावर गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षकांची मोठी गरज असल्याचे भरतीच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. रिक्त पदांपैकी तब्बल ३२.२२ टक्के पदे गणित-विज्ञान विषयांची आहेत.
या गटातील शिफारस झालेल्या ९ हजार १११ उमेदवारांपैकी १ हजार १११ उमेदवारांची गणित-विज्ञान विषयासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, प्राथमिक स्तरापासून माध्यमिक वर्गांपर्यंत विज्ञान विषयांच्या शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचे चित्र आहे. नव्या भरतीमुळे ही कमतरता काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे.
१२ हजारांहून अधिक रिक्त पदे
मुलाखतीविना निवड प्रक्रियेत उपलब्ध असलेल्या ११ हजार ७५४ रिक्त पदांपैकी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १२ हजार ६६१ पदे उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी ७ हजार ४७९ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
अकरावी-बारावी स्तरावरील गणित-विज्ञान विषयांसाठी १५ उमेदवारांची शिफारस झाली आहे. त्याचबरोबर भाषा, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयांसाठीही उमेदवारांना संधी मिळाली आहे.
मराठी, इंग्रजीसह इतर विषयांनाही संधी
इयत्ता सहावी ते आठवीसाठी मराठी विषयाच्या ५०७, इंग्रजी विषयाच्या ४७९, शारीरिक शिक्षणाच्या ३०२, समाजशास्त्राच्या ७२ आणि इतिहास-भूगोल विषयाच्या १२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
शिक्षक भरतीतील या प्रक्रियेमुळे एकीकडे शाळांमधील रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुसरीकडे विशेषतः महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात नियुक्ती आदेशाकडे आता उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.