Maharashtra Education Scam : डीएड उत्तीर्ण प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिकेची परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधीच पेपरफुटी झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
विशेष म्हणजे, हरियाना आणि बिहारमधील तिघांनी महाराष्ट्रातील हा पेपर फोडल्याने यामागे मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण देशभरात गाजत असतानाच महाराष्ट्रातही आणखी एक मोठा परीक्षा घोटाळा समोर आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हरियानातील धीरज बलराज सिंग (28), बिहारमधील राजीव शॉ (45) आणि आकाश कुमार (30) या तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून रविवारी होणाऱ्या TET परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकांचे चार संच जप्त करण्यात आले. अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीचे पोलिस उपायुक्त डॉ. पवन बनसोड यांना शनिवारी गोपनीय माहिती मिळाली होती की, काही संशयित TET ची प्रश्नपत्रिका विकण्यासाठी भिवंडीत येणार आहेत. या माहितीनंतर पोलिसांनी (Police) कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-नाशिक महामार्गावरील ओवळी डोंगराळी गाव परिसरात सापळा रचला.
या कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या संशयित वाहनाची तपासणी केली असता आरोपींकडून चार प्रश्नपत्रिका संच सापडले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केल्यानंतर हे प्रश्नसंच रविवारी होणाऱ्या अधिकृत TET परीक्षेचेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी हे प्रश्नपत्रिका दिल्लीहून महाराष्ट्रात घेऊन आले होते आणि भिवंडीत तब्बल दीड कोटी रुपयांना विकण्याचा त्यांचा प्लॅन होता. आरोपींपैकी धीरज सिंग विज्ञान शाखेचा पदवीधर असून इतर दोघेही उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. डॉ. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, नऊ पोलिस निरीक्षक आणि 20 कर्मचाऱ्यांची टीम तपास करणार आहे.
आता या तपासात अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या टोळीचा खरा सूत्रधार कोण? प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर आली? छपाई केंद्रातून की मुख्य परीक्षा केंद्रातून पेपर लीक झाला? राज्यातील आणखी कोण या रॅकेटमध्ये सहभागी आहे का? आणि आतापर्यंत किती उमेदवारांना पेपर विकण्यात आला?
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील TET परीक्षेला घोटाळ्यांचे ग्रहण लागण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2018 आणि 2019 मध्येही मोठ्या प्रमाणावर पेपरफुटी आणि बोगस उमेदवार घोटाळे उघडकीस आले होते. त्या वेळी तब्बल नऊ हजारांहून अधिक बोगस उमेदवारांवर कारवाई करण्यात आली होती. सतत समोर येणाऱ्या अशा पेपरफुटीच्या घटनांमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.